जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठी कारवाई..
विश्वास वाडे चोपडा प्रतिनिधी
चोपडा,दि.२२ आॕगस्ट:– शहरातील बस स्थानक परिसरात हरियाणा या राज्यातील दोघांना 12 गावठी बनावटीचे कट्टे व 5 जिंवत काडतुस हे अवैधरित्या बाळगल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीसांनी ताब्यात घेतले व त्यांच्याकडून जवळपास दोन लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व त्यांच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 18 ला सुद्धा अवैध शस्त्रांसंबंधी अशीच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी 6 गावठी कट्टे व 30 जिंवत काडतुसे जप्त करण्यात आली होती.याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. 22/08/2022 रोजी सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास चोपडा शहरात बस स्थानक परिसरात आरोपी नामे 1) अमीतकुमार धनपत धानिया वय 30 रा. भागवी ता. चरखी दादरी जि. भिवानी, 127307 (हरीयाणा) व 2) शनेशकुमार रामचंदर तक्षक वय 32 रा. भागवी ता.चरखी दादरी जि.भिवानी, 127307 (हरीयाणा) यांनी विना परवाना बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायदयासाठी 2,60000/- रुपये किमंतीचे 12 गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच 5000 रुपये किमंतीची 5 पिवळया धातुचे जिवंत काडतुस हे कोणास तरी विक्री करण्याचे उद्देशाने बाळगले म्हणून त्यांच्यावर चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीएनएस भाग 5 गुरनं. 348/2022 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीतां जवळून 12 गावठी बनावटीचे कट्टे, 5 जिंवत काडतूस व 3 मोबाईल फोन असा एकुण 2,77000/- किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घटनास्थळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण, सहा.पोलीस निरिक्षक अजित साळवे व संतोष चव्हाण यांनी भेट दिली.सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे, पोलीस नाईक संतोष पारधी, संदिप भोई, किरण गाडीलोहार, पोकाँ. प्रमोद पवार, प्रकाश मथूरे आदिंच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.