प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून दुर्दैवी घटना समोर आली आहे. सेवाग्राम येथील डॉ. विठ्ठल सर्जेराव साळवे यांनी सेलू तालुक्यातील रिधोरा धरणात आत्महत्या केल्याच्या घटनेनं संपूर्ण जिल्हात एकच खळबळ माजली आहे. त्यांचा मृतदेह शनिवारी दुपारी जलाशयात आढळून आला.
सेवाग्राम येथील डॉ. विठ्ठल सर्जेराव साळवे हे शुक्रवारपासून बेपत्ता होते. त्यांचा शोध नातेवाईक व मित्रमंडळी घेत होते. शोध घेत असताना मृताची दुचाकी धरणाच्या पायथ्याशी दिसून आली. शोध घेणाऱ्यांनी जलाशयात डोकावल्यावर त्यांना डॉक्टरचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसला.
रिधोराचे माजी सरपंच अरविंद सिराम यांनी या घटनेची माहिती सेलू पोलीसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड हे आपल्या पोलीस ताप्यासह यांनी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ही आत्महत्या असून शुक्रवारी सायंकाळी घडली असावी, असा कयास बांधण्यात येत आहे.
मृतक डॉ. विठ्ठल वय 37 वर्ष यांनी सेवाग्रामच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस व एमडी हे शिक्षण घेतले होते. एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करायचे. सेवाग्रामलगत धन्वंतरी कॉलनी येथे त्यांचे घर होते. पण त्यांनी आत्महत्या का केली याची माहिती अजून पर्यंत समोर आली नाही.

