रवींद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षावर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित मोहन अग्रवाल यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांविरोधात परतूर पोलिस स्टेशन मध्ये गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका 36 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांकडून काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
परतूर शहरातील एका 36 वर्षीय महिलेने परतूर शहर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संशयित मोहन अग्रवाल व त्यांची दोन मुले कृष्णा अग्रवाल व तेजस अग्रवाल हे 22 जून रोजी रात्री बारा वाजता या महिलेच्या घरी गेले. तुमचा मुलगा कुठे आहे, अशी त्यांनी विचारणा केली. तो घरी नसल्याचे महिलेने सांगितले. दरम्यान यावेळी मोहन अग्रवाल यांनी फिर्यादीच्या पतीला धक्काबुक्की केली. शिवाय, फिर्यादीच्या हातावर लोखंडी रॉड मारला. फिर्यादीच्या भाचीचा हात धरून तिला ओढले. तुझ्या मुलाला बोलावले नाही तर ठार मारू, अशी धमकी त्यांनी दिली. सदरील महिलेच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसात संशयित आरोपी मोहन अग्रवाल, कृष्णा अग्रवाल, तेजस अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
अग्रवाल यांच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल…
मोहन अग्रवाल यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांविरोधात परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असताना, मोहन अग्रवाल यांच्या मुलाच्या तक्रारीवरून देखील एकूण सहा लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परतूर शहरातील एका लॉजसमोर तेजस मोहन अग्रवाल हे गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता आपले रेस्टॉरंट बंद करून जात होते. त्याचवेळी एकूण 6 संशयित आरोपींनी त्यांना मारहाण केली. तुझ्याकडचे पैसे दे, अशी मागणी त्यांनी केली. तेजस यांनी नकार देताच त्याला बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व गळ्यातील पाच तोळ्यांची चेन काढून घेऊन संशयित फरार झाले. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे हे करत आहेत.

