वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- गेल्या काही काळात एका पाठोपाठ एक एकतर्फी प्रेमातून हत्या होत आहेत. ती विकृती आहे का? की त्यामागे आणखी काही कारणं आहेत? यावर स्त्री प्रश्नावर काम करणाऱ्या पुण्यातल्या अभिव्यक्ती संघटनेने प्रेमाचा अधिकार आणि हिंसेचा प्रश्न हा संवादात्मक कार्यक्रम आयोजित केला होता. त्याबाबत अधिक मांडणी करताना अभिव्यक्तीच्या कार्यकर्त्या कल्याणी दुर्गा रवींद्र म्हणाल्या, की एकतर्फी प्रेमातून हत्या करणे/ऍसिड फेकणे ही विकृती नाहीत तर लहानपणा पासून मुलामुलींना आपल्या समाजात ज्याप्रकारे वाढवले जाते. त्यात याची कारणे दडलेली आहेत. अगदी लहानपणापासून दोघांचे खेळ बघितले तर मुलांची खेळ स्वयंपाकघराशी निगडित आणि मुलांचे बॅट – बॉल, हाणामारीचे – मारामारीचे याशिवाय घरातील वातावरण ज्यात सतत आई – घरातील इतर स्त्रियांचा अपमान – मारझोड-शिवीगाळ हे चित्र. वंशाचा दिवा असणाऱ्या मुलासाठी सर्व गोष्टी माफ आणि मुलींसाठी सर्व बंधनं. यातून मुलींचे व्यक्तिमत्त्व न बोलणारे-आवाज हळू – कोणी काहीही म्हटले – अपमान केला – छेडछाड केली तरी गप्प बसणे आणि मुलांचे व्यक्तिमत्त्व निडर, न रडणारा, रांगडा, दबंग यामुळे जेव्हा ही मुले तारुण्यात प्रवेश करतात. निसर्गतः एकमेकांचे आकर्षण हेच प्रेम समजून जातात. त्यात लहानपणापासून त्यांनी पाहिलेले असते स्त्रियांना काबूत ठेवायचे आहे, त्यामुळे जे मुलीवर प्रेम करत असतात, ती त्यांच्या मालकीची होते. ती नाही म्हणणे हा शक्यच नसते अशी त्यांना खात्री असते. जर तिने नाही म्हटले तर परिणीती खून-बलात्कार-ऍसिड अटॅक.
त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, यात हिंदी चित्रपटातील गाणी-आयटम साँग-डायलॉग आणखी भर घालतात. तुम मेरी नहीं हो सक्ती तो मैं तुम्हे और किसिकी नहीं होने दूंगा. यातून हिंसा जन्माला येते. प्यार एकही बार होता है- वगैरे.. हेही लक्षात घेतले पाहिजे की प्रेमात उभं राहणं आवश्यक असतं. प्रेम कितीही वेळा होऊ शकते. चित्रपट आणि रोजचे सामान्य माणसाचे आयुष्य यात जमीन आस्मानाचे अंतर आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे समाजाला मुलामुलींना वाढवताना भेदभाव करून मुलगा आणि मुलगी याऐवजी माणूस म्हणून घडवणारी वागणूक त्यांना दिली. तसेच, मुलीलाही नाही म्हणायचं अधिकार आहे.
जिच्यावर प्रेम करतो ती मुलगी मालकीची-हक्काची वस्तू नसून माणूस आहे, तिला नाही म्हणायचं अधिकार आहे. याशिवाय प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीवर मालकी नसून त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य- स्वतंत्र विचार यांचा मानसन्मान- आदर करणे होय. आणि त्याची शिकवण दिली पाहिजे. हिंसक- मारझोड करणारा – ताब्यात ठेवणारा – मालकी गाजवणारा प्रियकर – नवरा कोणत्याच मुलीला नको असतो, याची शिकवण द्यावी लागेल. त्यासाठी समाजाच्या सर्व पातळ्यांवर म्हणजे घर-शाळा-महाविद्यालय इथे विद्यार्थ्यांशी-पालकांशी संवाद साधला पाहिजे, असेही शेवटी कल्याणी यांनी प्रतिपादन केले.
यावेळी तरुणाईचा उत्तम प्रतिसाद होता. अनेकांनी आपले अनुभव-दुःख किंवा प्रेमभंगातून पुन्हा उभं राहणं असे वेगवेगळे अनुभव मांडले. कार्यक्रम लोकायत हॉल, नळस्टॉप येथे पॅट पडला. या कार्यक्रमाची सुरुवात आणि शेवट चळवळीच्या गाण्यांनी झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा सपकाळ यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

