🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा:- जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सुरक्षेचा यंत्रणासह सुसज्ज असलेल्या एटीएम मशीन जेव्हा चोरटे फोडतात तेव्हा शहरातील सुरक्षेवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. बँकेच्या एटीएममध्ये प्रवेश करुन गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम समोरील भाग कापून तब्बल 23 लाख 78 हजार 800 रुपयांची रोकड चोरट्यांनी पळविली. ही घटना वायगाव (नि.) येथील बाजार चौकात मध्यरात्री 2 ते 3 वाजताच्या सुमारास घडली. चोरट्यांनी या एटीएम फोडण्यासाठी चोरीच्या विविध वाहनांचा वापर केला. ही घटना आज 29 रोजी सकाळी उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी बोलेरो वाहनाने वायगाव येथे पोहोचत मध्यरात्रीच्या सुमारास बाजार चौकातील एसबीआय कंपनीच्या एटीएममध्ये प्रवेश केला. गॅस कटरने एटीएम फोडून त्यातील 23 लाख 78 हजार 800 रुपयांची रोकड चोरुन सिनेस्टाईल पळ काढला. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनी वायगाव गाठून घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी देवळी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन ठिकाणी एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी आधी टवेरा, कॅम्पर आणि शेवटी आर्वी तालुक्यातील सोरटा येथील स्कूल व्हॅन चोरून पळ काढला. पोलिसांनी तवेरा व कॅम्पर ही दोन्ही वाहनं जप्त केली असून पोलिस स्कूल व्हॅनचा शोध घेत आहे.