सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर,दि.29 ऑगस्ट:- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा संपूर्ण तयारीकरीता दिल्ली येथील खाजगी संस्थेमधून प्रशिक्षण घेण्यासाठी, प्रशिक्षणार्थी निवड करण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून या योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
प्रशिक्षणार्थीची सर्वसाधारण पात्रता :
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. तसेच परीक्षेची इतर अहर्ता, शिक्षण, वय, इतर पात्रता व अटी पूर्ण केलेल्या असाव्यात. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील कमीत कमी 5 वर्षे रहिवासी असावा. प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा अर्ज करतेवेळी उमेदवाराकडे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तसेच अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवारास या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येणार नाही. उमेदवारास कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारणास्तव प्रशिक्षण सोडावयाचे असल्यास त्या उमेदवारास प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणाकरीता संस्थेने केलेला खर्च आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेस परत द्यावा लागेल. प्रशिक्षण कालावधीत उमेदवाराने धुम्रपान करणे, अमली पदार्थाचे सेवन करणे, मद्यपान करणे, उद्धट वर्तन असे गैरप्रकार केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
प्रशिक्षणार्थींना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा :
नवी दिल्ली येथील श्रीराम आय.ए.एस या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेताना प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास दर महिना रुपये 12 हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येईल. सदर विद्यापीठासाठी प्रशिक्षणार्थीची हजेरी किमान 75 टक्के असणे बंधनकारक आहे. पुस्तक खरेदीकरिता प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास एकदाच रुपये 14 हजार देण्यात येईल. सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी, नियमित स्वरूपाचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख मंगळवार दि.20 सप्टेंबर 2022 आहे. उमेदवारास आवेदन पत्रे भरतांना तसेच संबंधित इतर तांत्रिक अडचणी असल्यास अधिक माहितीसाठी वेबसाईटवर देण्यात आलेला हेल्पलाइन क्रमांक व ई-मेल आयडी वरच संपर्क साधावा.
सदर योजनेचा सविस्तर तपशील, शासन निर्णय आवश्यक कागदपत्र, इत्यादी बाबतच्या अधिक माहितीकरिता https://trti.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरूनच ऑनलाईन स्वरूपात अर्ज करावेत. सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीची निवड ही सामायिक प्रवेश परीक्षाद्वारे गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे. असे पुणे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.