🖋️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतनिधी
राहुरी :- दगडाने भरलेला ट्रॅक्टर खाली करण्याच्या कारणावरून सुनीता चव्हाण या महिलेला शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. सुनीता समिर चव्हाण या महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. 27 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान आरोपी हे ट्रॅक्टरमध्ये दगडे घेऊन आले आणि सुनीता चव्हाण यांच्या घरासमोर ट्रॅक्टर खाली करू लागले. तेव्हा सुनीता चव्हाण या त्यांना म्हणाल्या की, तुम्ही आमच्या घरासमोर ट्रॅक्टर खाली करू नका. या जागेचा दावा तहसीलदार यांच्यासमोर चालू आहे. त्याचा निकाल लागला नाही.
या म्हणण्याचा आरोपींना राग आल्याने ते सुनीता चव्हाण यांना म्हणाले की, आम्हाला येथे घर बांधायचे आहे. तू आम्हाला विचारणारी कोण? असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. सुनीता चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी शरिफ सत्तार मुसाणी, आमीन सत्तार मुसाणी, जुबेर अन्वर मुसाणी (सर्व रा. राहुरी बुद्रूक, ता. राहुरी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शहामद शेख करीत आहेत.