खा. उदयनराजेंनी शिंगणापूरात दिली मानाची तलवार ; जेजूरीत ‘यळकोट, यळकोट जय मल्हार’ चा गजर
शिव-शक्ती परिक्रमेच्या स्वागताला सातारा जिल्हयात कार्यकर्त्यांची तोबा गर्दी.
श्याम भूतडा,बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड/सातारा दिनांक 06:- शिव-शक्ती परिक्रमेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या स्वागताला सातारा जिल्हयात कार्यकर्त्यांची तोबा गर्दी रस्त्यावर उसळली होती. शिखर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेव मंदिरात खासदार उदयनराजे भोसले यांनी मानाची तलवार देत त्यांचं जंगी स्वागत केलं. जेजूरीत ‘यळकोट, यळकोट जय मल्हार’ चा गजर करत त्यांनी मल्हारी मार्तंडचं दर्शन घेतलं.
पंकजा मुंडे सकाळी पुण्याहून साताऱ्याकडे रवाना झाल्या. सुरवातीचं मोठं स्वागत सासवड येथे झालं. जेजूरीत प्रवेश करताच ग्रामस्थांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं, त्यानंतर जेजूरी गडावर जाऊन त्यांनी मल्हारी मार्तंड खंडोबारायाचं मनोभावे दर्शन घेतलं. मंदिर परिसरात जिर्णोद्धार कामाची देखील त्यांनी पाहणी केली. ‘यळकोट, यळकोट जय मल्हार’ चा गजर तळी उचलली.
खासदार उदयनराजेंकडून स्वागत : शिखर शिंगणापूर येथे शिव-शक्ती परिक्रमेचं वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत प्रचंड उत्साहात कार्यकर्त्यांनी पंकजाताईंच्या हाती मशाल देत स्वागत केलं. श्री शंभू महादेव मंदिरात खासदार उदयनराजे भोसले यांनी पंकजाताईंच मानाची तलवार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. शंभू महादेवाचे विधिवत पूजन करून त्यांनी दर्शन घेतलं. फलटण येथे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या कुटुंबियांनी निवासस्थानी पंकजाताईंचा सत्कार केला. दहिवडे, कातर खटाव, एनकुळ, मायणी, विटा आदी भागातील ग्रामस्थांनी पंकजाताईंचं प्रचंड जल्लोषात स्वागत केलं.