मंगेश जगताप, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीवरील चालत्या टॅक्सीमध्ये अत्याचाराची घटना समोर आली आहे. त्यामुळे मुंबई शहर हादरलं आहे. त्यामुळे महिलाच सुरक्षेचा मुद्दा परत एकदा चर्चेत आला आहे.
येथे एका 14 वर्षांच्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर चालत्या टॅक्सीमध्ये अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. नराधम आरोपींनी चालत्या टॅक्सीत हे घृणास्पद कृत्य केले. त्यानंतर त्यांनी तिला रस्त्याच्या कडेला उतरवून ते तेथून फरार झाले. हा गुन्हा उघडकीस आल्यानंत पोलिसांनी तातडीने तपास करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये टॅक्सी चालकाचाही समावेश आहे. दोघांविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
प्राप्त माहितीनुसार, 18 सप्टेंबर रोजी 14 वर्षांच्या या अल्पवयीन मुलीचे तिच्या कुटुंबियांशी काही कारणावरून भांडण झाले होते. त्याच रागात ती घराबाहेर पडली आणि तिने मालाड येथे तिच्या बहिणीच्या घरी जाण्याचे ठरवले. खाली उतरल्यानंतर रस्त्यावर ती टॅक्सी शोधत असताना आरोपीची टॅक्सी तिच्यासमोर आली व ती टॅक्सीत बसून मालाडच्या दिशेने रवाना झाली
चालत्या टॅक्सीत केला अत्याचार: तिला मालाडमधील मालवणी येथे जायचे होते. टॅक्सी जेव्हा दादरला पोहोचली तेव्हा टॅक्सी ड्रायव्हर प्रकाश पांडे याने त्याचा मित्र सलमान वय 26 वर्ष यालाही टॅक्सीत बसवले व त्यांनी पुढला प्रवास सुरू केला. दादर ते सांताक्रूझ दरम्यान सलमान याने त्या अल्पवयीन मुलीवर घृणास्पद अत्याचार केला. ते जेव्हा मालवणी येथे पोहोचले तेव्हा त्यांनी पीडित मुलीला टॅक्सीतून खाली उतरवले आणि ते दोघेही तेथून लगेच फरार झाले. पीडित मुलगी कशीबशी तिच्या नातेवाईकांच्या घरी पोहोचली आणि तिने त्यांना घडलेला सर्व प्रकार कथ केला. त्यांनी लगेचच तिच्या पालकांना याबाबत कळवले तसेच पोलिसांकडे जाऊन घडलेल्या अत्याचाराबाबत सांगून तक्रारही नोंदवली.
दोन्ही नराधम आरोपींना अखेर अटक…
हे प्रकरण समजल्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्या भागातील सीसीटीव्ही फूटेजचा तपास करून आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांतच दोन्ही आरोपींना शोधून काढले आणि त्यांना जेरबंद केले. आरोपी सलमान आणि टॅक्सी ड्रायव्हर प्रकाश पांडे या दोघांनाही अटक करण्यात आली असून सलमानची मदत केल्याचा आरोप प्रकाश याच्यावर लावण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध बलात्कार आणि पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींची देखील वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

