युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपूर पासून जवळ असलेल्या पाचगाव इथं एका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण नागपुर जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. भाजपा नेत्याची हत्या नेमका कुणी व का केला याचा तपास पोलीस करत आहेत.
राजू डेंगरे हे भारतीय जनता पक्षाचे नागपूर ग्रामीणचे महामंत्री होते. नुकतेच ते ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले होते. विहिरगाव परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना मिळताच ते संपूर्ण फौफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.यावेळी राजू डेंगरे यांचा मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
भाजपा नेते राजू डेंगरे यांच्या हत्येची माहिती परिसरात समजताच भाजप कार्यकर्ते व नागरिकांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात पोलिसांशी चर्चा केली. तसंच, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं.
पैशांसाठी झाली हत्या?
भाजपा नेते राजू डेंगरे यांची हत्या त्यांच्याच ढाब्यावरील कर्मचाऱ्यांनी केल्याचा संशय आहे. डेंगरे यांच्याकडील पैसे देखील हल्लेखोरांनी पळवल्याचं बोललं जात आहे. डेंगरे यांची हत्या केल्यानंतर आरोपी ज्या गाडीतून पळून गेले, त्या गाडीला अपघात झाल्याचं आढळून आलं आहे. मात्र, आरोपी फरार आहेत. या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. डेंगरे यांच्या हत्यामागे राजकीय हेतू आहे की आणखी काही हे देखील तपासलं जात आहे.

