✍️लेखक: हंसराज कांबळे, राह. नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन:- सहा डिसेंबर हा दिवस आपणा सर्वांसाठी दुःखद घटनेचा दिवस आहे. “सूर्याचा अस्त झाला , सागर शांत झाला , आकाशातील तारा निखळला…” आपल्या रक्ताचे सिंचन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांतीचे रसायन पुरविणाऱ्या युद्ध लिपीच्या अन्ववस्त्राचे साठे अधोरेखित केले होते. महासूर्याशी आमचे नाते आमच्या रक्ता पेक्षाही अधिक जवळचे आहे. ते आपल्यातून शरीराने जरी गेले असतील तरीपण त्यांच्या लिखित पुस्तकातून, भारतीय संविधानाच्या निर्मितीतून, खंडाचे रूपातून, मार्गदर्शक म्हणून आहेतच. तिरस्करनीय गुलामगिरीने नि अमानुष अन्याय यांच्या गर्तेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्माला आलो आहे त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यात मी अपयशी ठरलो तर स्वतःला गोळी घालीन अशी घनघोर प्रतिज्ञा करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. आपल्या देशाच्या भविष्यकालावर आणि मानवी स्वातंत्र्याच्या इतिहासात त्यांनी आपले नाव आपल्या पराक्रमाने करून ठेवले आहे. लेखक इमर्सन म्हणतो – महापुरुष जन्मास येताच त्यांची मूस निसर्ग मोडून टाकतो हे वचन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यथार्थ लागू होते. आपल्या समाजाबद्दल आस्था व्यक्त करताना लिखित स्वरूपात त्यांनी लाख मोलाचा संदेश दिला होता. ते म्हणतात – विनय आणि ज्ञान यावर माझी आत्यंतिक निष्ठा आहे. अस्पृश्य समाजात मी जन्माला आलो याबद्दल मला अभिमान वाटतो. मी जे जे काही यश संपादन केले आहे ते आपल्या समाजाने सर्वस्वी पाठिंबा दिल्यामुळे संपादन करू शकलो. संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. लेखक धनंजय किर. पृष्ठ. क्र.५१०.पैरा – शेवटचा.
भारताच्या शूरातील एक शूर पुत्र म्हणून त्यांचा उल्लेख करून जगातील एक पहिल्या श्रेणीचे बुद्धिमान महान पुरुष, भीम पुरुष म्हणून आपण आणि संपूर्ण जग त्यांना ओळखते. त्यांच्याविषयी विचार करणे म्हणजे एखाद्या प्रचंड पर्वताची आठवण करणे होय. त्यांच्या ठाई ज्ञान गंगोत्रीचा अपार ठेवाच होता. असे म्हटल्यास वावगे ठरु नये. सरळ, साध्या आणि आवेशपूर्ण अशा त्यांच्या वक्तृत्वाला एक आगळीच गोडी होती. आपल्या व्यासंगामुळे संपादन केलेला आत्मविश्वास नि विषयांचा संपूर्ण अभ्यास, भाषेवर प्रभुत्व या बळामुळे त्यांच्या निर्भय सल्ल्याला एक प्रकारची धार येई . त्यांच्या अख्या आयुष्यात निंदक, विरोधक, स्तुती पाठक ही होते. पण त्यांच्या विचारावरती ते ठाम होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवित कार्याच्या संघर्षामुळे भारताच्या लाजरीवाण्या जिण्याचे, निराशेचे अंधकाराचे दिवस आता आपले संपले. आपणा सर्वांना गुलामगिरीची दारे मोकळे करून देऊन त्यांनी न्यायाधीशाची भूमिका बजावली. अशाप्रकारे ते समाजात जन्मलेले पहिले महान क्रांतिकारक नेते होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजाराने पंगू आणि शिथिलगात्र झाले होते. त्यांच्या हृदयात अपरंपार दुःख होते. आपले जीवित कार्य आपण पूर्ण करू शकत नाही या दुःखीत जाणिवेने दुःखातिशयाने हे रडत. त्यांना आपल्या लोकांना डोळ्यात देखत राज्यकर्ती जमात त्यांना बनवायची होती. ते नानकचंदला म्हणतात –
माझ्या लोकांना सांग की, जे काही मी केले आहे ते मी अनंत हालअपेष्ठा आणि आयुष्यभर दुःखे भोगुन आणि माझ्या विरोधकांशी लढून मी मिळविले आहे. महत प्रयासाने हा काफीला जिथे दिसतो आहे तेथे आणून ठेवला आहे. मार्गात कितीही अडचणी आणि संकटे आली तरी तो काफिला आता मागे फिरता कामा नये. जर माझ्या सहकाऱ्यांना तो काफीला पुढे नेता येत नसेल, तर तो तेथेच त्यांनी ठेवावा. पण काही झाले तरी तो मागे नेता कामा नये. हाच माझ्या लोकांना माझा संदेश आहे. संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. लेखक धनंजय कीर. पृष्ठ. क्र.५५० – ५५१. पैरा – पहिला – शेवटचा.
समाजावर जिवापाड अतोनात प्रेम करून, संघर्षाची जाणीव करून देणारा, जनजागृतीचा विस्तव तेवत ठेवणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिवाय जगात दुसरा आजपर्यंत कोणीही झाला नाही. शेवटी ते निर्धार करून समाजातील माणसाचे मन पक्के करण्यासाठी, हक्कासाठी, न्यायासाठी, लढण्यासाठी प्रोत्साहित करताना ते म्हणतात – मी तुमच्यासारखाच एक माणूस आहे. माझ्यापासून तुम्हाला जी काही मदत पाहिजे आहे. ती मी द्यायला तयार आहे. तुम्हाला तुमच्या आजच्या वाईट स्थितीतून मुक्त करण्याचे मी ठरविले आहे. माझ्यासाठी मी काहीच करीत नाही. तुम्हाला कर्तबगार बनता येईल इतके कसोशीचे प्रयत्न मात्र मी करीत राहणार. तुम्ही आपल्या परिस्थितीची जाणीव करून घ्या व मी जो मार्ग दाखविला तो अनुसरा. म्हणजे तुमचे हीत तुमचे कर्तबगार आल्याशिवाय राहणार नाही. संदर्भ – खंड. क्र.१८ भाग – १. पृष्ठ. क्र.४८१. खालच्या सात ओळी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मी मार्गदाता आहे, मुक्तिदाता नाही असे न म्हणता आपणा सर्वांना त्यावेळच्या वाईट स्थितीतून मुक्त करण्याचे ठरविले होते आणि ते प्रत्यक्षात करून दाखविले. तीच सुखाची फळे आज आपण भोगीत आहोत.
पुन्हा ते खिन्न मनाने भावविवेश होऊन समाजाची चिंता करुन, प्रश्न निर्माण करून म्हणतात – माझे आयुष्य मी तुमच्या हितार्थ वेचतो आहे पण माझ्या पश्चात या समाजाचे कसे होइल.? ही माझी चिंता दूर करणारी माणसे तुमच्यात अजून तयार होऊ नयेत ? या सर्व गोष्टीचा विचार केला की , माझे आयुष्य तुझ्यासाठी फुकट खर्च घातले असे वाटू लागते. संदर्भ – खंड. क्र.१८ भाग – ३. पृष्ठ. क्र.३१५.पैरा – १.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपरोक्त केलेले विधान आजही तंतोतंत लागू पडत असून भाडोत्री पुढाऱ्यांनी सत्ताधारी संघात केलेलीं अमिषापोटीची घुसखोरी सताड डोळ्यांनी आपण पहातच आहोत. स्वयंप्रकाशित मनुष्य दुसऱ्या भोवती केव्हाही उपग्रह म्हणून फिरत नसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंभू, स्वयंप्रकाशित, स्वतंत्र प्रज्ञावंत होते. हे वादळी मनोवृत्तीचे होते. वृत्तपत्र पंडिताला मुलाखत देताना ते म्हणतात – मनुष्याच्या अंगी जे काही थोरपण येते ते त्याच्या अखंड उद्योगशीलतेतून, तपश्चर्येतून (ध्यान साधना नव्हे) निर्माण होते.” मी भोगलेल्या हालअपेष्टांची तुम्हाला कल्पना यायची नाही. दुसऱ्या एखाद्या मनुष्याच्या समूळ नाश झाला असता. संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र .लेखक धनंजय कीर. पृष्ठ. क्र.५२७.पैरा – शेवटचा पहिली ओळ.
यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपरोक्त संदर्भातील शेवटच्या ओळीत दुसऱ्या एखाद्या मनुष्याचा त्यात समूळ नाश झाला असता हया वाक्यास गांभीर्याने आपल्या समाजातील लोकांनी समजून घेतल्यास त्यांना किती अतोनात विरोधकांचा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला असेल याची प्रचिती येते.
ध्येयासाठी अविरत परिश्रम केल्यामुळे मनुष्याला कार्य करण्याची अफाट शक्ती नि प्रशसनीय नैतिक धैर्य लाभते ते त्यांच्या अंगी होते. त्यांनी त्यांच्या अंगी असलेली शक्ती वाढवण्यासाठी सर्व आयुष्यभर सायास केले, साधना केली. ती संपादन केलेली शक्ती गुलामगिरीत पडलेल्या आपल्या बांधवांच्या शृंखला तोडण्याच्या कार्यी व्यतीत केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे पार्थिव देह फुलांनी आणि पुष्पहारानी भरलेल्या एका ट्रकवर ठेवण्यात आले. नामदेवराव व्हटकर यांचे कानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाची वार्ता कळताच ते मुंबईतच होते. डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची अंत्ययात्रा चित्रित करून ठेवावी अस त्यांच्या मनात आलं.. चित्रपट, नाटक यामुळे त्यांच्या अनेकांशी ओळखी होत्या.. त्यांनी अनेकांना विचारलं पण कुणी तयार होत नव्हत, काहींनी तर त्याच आम्हाला काय, तो तुमचा नेता आहे, अस्पृश्यांचा नेता आहे, आम्ही करणार नाही असं स्पष्ट शब्दात उत्तर दिल… कुणीतरी हे करेल अशी त्यांची भाबडी आशा फोल ठरली होती… येणाऱ्या काळासाठी या चित्रीकरणाच महत्व त्यांनी ओळखलं होत. कुणी मदत करो, न करो मी स्वतः करतो, असं त्यांनी ठरवलं. पण ही इतकी सहजसोपी गोष्ट नव्हती… त्यासाठी व्हिडीओ, रेकॉर्डिंगसाठी कॅमेरा आणी त्यासाठी रील या इतक्या खर्चिक गोष्टी होत्या की, त्याचा आज अंदाज देखील लावता येत नाही. अंदाजे तीन हजार फूट निगेटिव्हची रील, कॅमेरा आणी कॅमेरामन यासाठी जवळपास तेराशे ते चौदासे रुपये खर्च येईल असा अंदाज त्यांनी बांधला… आता पैसा कुठून उभा करायचा हा मोठा प्रश्न होता.. काही किरकोळ कारणासाठी काहीतरी तारण ठेऊन ते एका मारवाड्याकडून पैसे घेत असत… पण त्यावेळी रक्कम मोठी होती, त्यासाठी त्यांनी आपला एकमेव छापखाना गहाण ठेवावा लागला… त्यांना याच्या बदल्यात एकूण दीड हजार रुपये मिळाले… धावत – पळत ते शंकरराव सावेकर या कॅमेरामन कडे गेले… त्यांनी दीडसे रुपये प्रति दिवस भाड्याने एक कॅमेरा आणला… आणी रात्री 10 – 11 च्या सुमारास राजगृह गाठले.
डॉ. बाबासाहेबांच पार्थिव पहाटे आले… एका ट्रकवरून अंत्ययात्रेला सुरुवात झाली… याच ट्रकवर कसाबसा कॅमेरा लावून उभा राहण्याची जागा मिळाली… पहिला शॉट खोदादाद सर्कल वर घेण्यात आला.. यानंतर अंत्यदर्शनासाठी लोटलेल्या अलोट गर्दीचे दिवसभर चित्रीकरण सुरूच होत… सायंकाळी पार्थिव दादर चौपाटीवर पोहचलं.. याठिकाणी शाही मानवंदना देण्यात आली… चंदनाच्या लाकडावर पार्थिव ठेवण्यात आलं… त्यांच्या मुखाजवळ शेवटच लाकूड ठेवण्या पर्यंत चित्रीकरण सुरूच होत.. बाबासाहेबांचा शेवटचा चेहरा या ठिकाणी चित्रित झाला.. चितेला अग्नी दिल्यानंतर ही चित्रीकरण करण्यात आल.
या सगळ्या चित्रीकरणासाठी एकूण 2 हजार 800 फूट रील संपली होती. दुसऱ्या दिवशी बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीत ही फिल्म प्रोसेसला देण्यात आली आता ही फिल्म धुणे दुसऱ्या पॉझिटीव्हवर रशप्रिंट काढणे आणी एडिटिंग करणे यासाठी अडीच ते तीन हजार खर्च येणार होता. त्यासाठी पुह्ना त्याच मारवाड्याकडे जाऊन त्यांनी राहत घर गहाण ठेऊन तीन हजार रुपये आणले. पुढे या तारण ठेवलेल्या मिळकती सोडवता आल्या नाहीत… त्यामुळे त्या कायमच्या गेल्या.. मुबंई सोडावी लागली.
मालमत्ता गेली, तर गेली, पण डॉ. बाबासाहेबांच्या शेवटच्या स्मृती जपता आल्या.. त्यांच्या उघड्या चेहऱ्याचा या जगातील शेवटचा क्षण युगांयुगांसाठी कैद करता आलं.. याच समाधान त्यांना होत आज आपण पाहतोय त्या शेवटच्या क्षणाची आद. नामदेवराव व्हटकर यांनी केलेलं… हे जगातील एकमेव चित्रफीत आहे या गोष्टीच कधीही श्रेय घेतलं नाही किंवा याचं भांडवल केलं नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चिते जवळ बोलतांना भिक्खू आनंद कौशल्यम म्हणाले – डॉ. आंबेडकर एक महान नेते होते. त्यांनी देशाची सेवा करून निर्माण प्राप्त करून घेतले.
महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी संलग्न असलेले आचार्य प्र.के अत्रे आपल्या पहाडी आवाजात म्हणालेत – आंबेडकरांनी दलितांच्या हक्कासाठी त्याग केला आणि लढा दिला. आंबेडकरांनी अन्याय छळ नि विषमता यांच्याशी लढा दिला. हिंदू धर्माच्या विरुद्ध त्यांनी बंड केले नाही. तो सुधारण्याचा प्रयत्न केला. अत्रे यांचे भाषण ऐकून त्या जनसागराला पुन्हा दुःखाची भरती आली. स्मशानाबाहेर समुद्रकिनाऱ्यावर शोकग्रस्त अवस्थेत उभ्या असणाऱ्या जनसागराच्या दुःखात सागर सुद्धा सामील झाला.
सर्व राष्ट्राने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधना संबंधी शोक केला. त्यांच्या मृत्यूमुळे देशाचा एक महान सुपुत्र हरवला असे सर्व पक्षांनी उद्गार काढले. ज्यांनी गेल्या 30 वर्षापेक्षा अधिक काळ राष्ट्राच्या घडामोडीत धडाडीने भाग घेऊन अनेकविध महत्त्वाचे नि प्रभावी कार्य केले की व्यक्ती काळाने हिरावून नेली.
त्यावेळेसचे भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले आंबेडकर आमच्या घटनेचे शिल्पकार आहेत आणि त्यांची अनेक क्षेत्रातील सेवा आणि विशेषता दलितांच्या उद्धारा करिता केलेली सेवा फारच महनिय आहे.
मुंबईचे फ्री प्रेस जनरल दैनिक म्हणाले अन्यायाच्या विरुद्ध सात्विकपणे झगडणारा एक नेता म्हणून देशाला आंबेडकरांची आठवण चिरकाल राहील.
कलकत्त्याच्या स्टेटसमन दैनिक आणि म्हटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कारकीर्द म्हणजे बुद्धिमत्ता नि मनोनिग्रह यांचा झगडा होय.
ज्ञानाच्या अथांग सागराला विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम…🌷🙏