युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना एक खळबळजनक घटना समोर आली आहे येथे एका शेतकऱ्याने विधानभवनाची सुरक्षा भेदून विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सचिन उत्तम बहादुरे वय 29 वर्ष असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे विधानभवन परिसरात एकच खळबळ माजली आहे.
सचिन उत्तम बहादुरे या युवा शेतकऱ्यांनी विधान भवनाच्या गेट समोर विषारी द्रव्य प्राशन करताच काही वेळातच त्याची प्रकृती खालावली. मुख्य प्रवेशद्वारावरच तो कोसळल्याने पोलिस यंत्रणेच्या हे लक्षात येताच मोठी खळबळ उडाली. यावेळी पोलिसांनी त्याला रुग्णालयात रवाना केले. या घटनेबाबत कुणालाही कळणार नाही, याची पूर्ण दक्षता पोलिसांनी व विधान भवन परिसरातील अधिकाऱ्यांनी घेतली. मात्र, हा प्रकार उघडकीस आला.
सचिन उत्तम बहादुरे हे मंगळवारी ता.19 विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले. सरकार शेतीमालाला योग्य भाव देत नसल्याने शेतकऱ्यांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आपण जीव देत असल्याची घोषणा सचिन यांनी केली. त्यानंतर तातडीने त्यांनी खिशातील कीटकनाशकाची बाटली काढली व त्यातील द्रव्य प्राशन केले. काही सेकंदातच सचिन हे मुख्य प्रवेशद्वाराजवळ कोसळले. ही बाब लक्षात येताच विधान भवनाच्या परिसरात मुख्य प्रवेशद्वाराजवळ तैनात सुरक्षा अधिकाऱ्यांनी तातडीने सचिन यांना उचलले आणि वाहनातून इस्पितळाकडे रवाना केले. हा प्रकार घडला तेव्हा सरकारमधील काही मंत्री व आमदार मुख्य प्रवेशद्वारातून आत येत होते.
घटनेनंतर नेमके काय झाले याची माहिती घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. परंतु अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीची प्रकृती खालावली, असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.रात्री उशिरा या प्रकरणाचा उलगडा झाला व सचिन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. सचिन हे यवतमाळ जिल्ह्यातील मोरथ जहागीर या गावातील रहिवासी आहे. विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांसाठी यवतमाळ जिल्ह्याचे नाव सर्वांत वरच्या क्रमांकावर आहे.
सचिन हे विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्याने सुरक्षा भेदल्याच्या कारणावरून पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई पासून वाचवण्यासाठी या प्रकाराबद्दल लपवाछपी केल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य विधिमंडळाची हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक आहे, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील विदर्भात आंदोलन सुरू केले आहे. अशाच शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला असता तर विधान भवनात मोठी खळबळ उडाली असती व त्याचे पडसाद दोन्ही सभागृहांमध्ये उमटले असते. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विष प्राशन केलेल्या सचिन यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.