राजकारणामध्ये वेळ आल्यावर डॅशिंग निर्णय घ्यावे लागतात – एकनाथ शिंदे
मुंबईला देशातील नव्हे तर जगातील नंबर १ शहर बनवायचे आहे, हा तर फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है – एकनाथ शिंदे
नितीन शिंदे ठाणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राजकरणात कधी काय होईल याचा नेम नाही. मागील 55 वर्षे काँगेसशी प्रामाणिक कार्य करणाऱ्या देवरा कुटुंबीयांनी काँग्रेस पक्षाशी फारकत करून शिवसेना शिंदे गटाची जुळवून घेतल आहे. त्यामुळे काँगेसला मोठा धक्का बसला आहे.
यावेळी माझ्या कुटुंबाचे काँग्रेसशी असलेले नाते आज मी तोडत आहे, पूर्वीची काँग्रेस आणि आत्ताची काँग्रेस यामध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे असे शिवसेनेत प्रवेश करताना मिलिंद देवरा यांनी सांगितले
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मिलिंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मी मनापासून शिवसेनेत स्वागत करत आहे. तुमची जी भावना आहे ती भावना माझी ही दीड वर्षापूर्वी होती परंतु राजकारणा मध्ये वेळ आल्यावर डॅशिंग निर्णय घ्यावे लागतात. घरी बसणाऱ्यांना निवडणुकीत जनता साफ करणार आहे. असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
आज माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. मिलिंद देवरा सोबत काँग्रेसचे २५ माजी नगरसेवक आणि ४५० कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव, पदाधिकारी तसेच दक्षिण मुंबईतील विविध उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांनी आणि अनेक व्यापारी व व्यापारी संघटनांनी शिवसेनेत प्रवेश केला.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी है. मी दीड वर्षात एकही सुट्टी घेतली नाही, हेलिकॉप्टर मधून फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती केलेली चांगली. गावी गेल्यावर मी जनता दरबार घेतो. ऑफिस किंवा घरी बसून विकास होणार नाही मी रस्त्यावर उतरून काम करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आले की विरोधकांच्या पोटात दुखते. आमचे काम पाहून पोटदुखीचे रुग्ण वाढले आहेत. पण आम्हाला याने काही फरक पडत नाही. जनतेचा आणि महाराष्ट्राचा विकास करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे आणि आता मिलिंदजींची साथ मिळाल्याने हे उद्दिष्ट लवकर साध्य होईल याची मला पूर्ण खात्री आहे. शिवसेनेत त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून स्वागत करतो.
मुंबईत आम्ही सुरू केलेल्या डीप क्लिन ड्राईव्ह मोहिमेला मोठे यश मिळाले आहे, मुंबईतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात घटले, मी झाडू हातात घेतला की आयुक्त चहल, आमदार व खासदार ही हातात झाडू घेतात, तशाच प्रकारे निवडणुकीत विरोधकांची ही सफाई करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी मिलिंद देवरा म्हणाले की, गेली 55 वर्षे माझ्या कुटुंबाचे काँग्रेसशी असलेले नाते आज मी तोडत आहे, आज मी खूप भावूक झालो आहे. पूर्वीची काँग्रेस आणि आत्ताची काँग्रेस यामध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे. काँग्रेसमध्ये विकासात्मक व सकारात्मक मूल्यांना आणि मेरिट व योग्यतेला महत्व दिले जात नाही, म्हणून हा मोठा निर्णय घेतला. राजकारणामध्ये लोकसेवा आणि जनसेवा हीच विचारधारा असली पाहिजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखा मेहनती, दिवस रात्र काम करणारा, सर्व सामान्य माणसाला भेटणारा, चांगली निर्णय क्षमता असलेला, सहजपणे लोकांना भेटणारा, सगळ्यांची कामे त्वरित करणारा, जमिनीवरचा मुख्यमंत्री मी आत्ता पर्यंत पाहिलेला नाही आणि त्यांची कार्यपद्धती मला आवडली. राजकारणात जनतेची सेवा ही एकमेव विचारधारा आहे, हे मला त्यांच्या कामाकडे पाहताना शिकायला मिळाले. म्हणून मी शिवसेनेत प्रवेश करत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत आणि बळकट करायचे आहेत. मिलिंद देवरा पुढे म्हणाले की, ज्या काँग्रेसने माजी पंतप्रधान आणि त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी ३० वर्षांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा पायंडा रोवला तोच पक्ष आज देशातील उद्योगपतींचा अपमान करत आहे. त्यांना देशद्रोही म्हणत आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांचा विरोध करायचा हेच यांचे एकमेव उद्दिष्ट राहिलेले आहे असे मत मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले आहे.
माजी मंत्री मिलिंद देवरा यांच्या सोबत, महिला आयोगाच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका सूशीबेन शहा, माजी नगरसेवक सुनील नरसाळे, माजी नगरसेवक काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मांद्रेकर, माजी नगरसेवक रामबच्चन मुरारी, माजी नगरसेविका हंसा मारू, माजी नगरसेविका अनिता यादव, दक्षिण मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष रमेश यादव, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश राऊत, मारवाडी संमेलन के अध्यक्ष ॲड. सुशील व्यास, दक्षिण मुंबई महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष पूनम कनौजिया, डायमंड मर्चंटचे संजय शाह, दिलीप साकेरिया, निवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर, वराय मोहम्मद, सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त राजाराम देशमुख, प्रशांत झवेरी, जैन समाज सेवा संघाचे समर्थलाल मेहता, सौरव शेट्टी, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. त्र्यंबक तिवारी, कांती मेहता, उदेश अग्रवाल, प्रवीण अग्रवाल, ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कैलास मुरारका, आदींनी आज शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे ८५ वर्षाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरारजीभाई मोतीचंद यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला.