प्रशांत जगताप संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राज्यस्तरीय भव्य ‘नारी निर्धार मेळावा’ मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. तुम्ही जिजाऊ… सावित्रीबाईच्या लेकी आहात… छत्रपती शिवाजी राजांनी रयतेचे राज्य तयार केले तर सावित्रीबाईंनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. यांची प्रेरणा घेऊन नवीन पिढीला सोबत घेऊन पुढे जायचे आहे. महामानवांनी दिलेला वारसा जपायचा आहे असे आत्मविश्वास निर्माण करणारे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी या महिला मेळाव्यात केले.
यावेळी शेती, शिक्षण व इतर अनेक क्षेत्रांमध्ये महिला, युवती आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना एसटीमध्ये वाहकाबरोबर आता चालकही महिला बनल्या आहेत. वैमानिक बनल्या आहेत. महिलांची रित आहे जे काम करायचे ते चोख करतात अशा शब्दात महिलांचे कौतुक ना. अजितदादा पवार यांनी केले.
शाहू – फुले – आंबेडकर यांचे विचार घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन आपण पुढे जात आहोत. एका वेगळ्या विचाराने आपण राज्याच्या विकासासाठी सत्तेत सहभागी झालो आहोत. राज्यात ज्या ज्या वेळी अनेक प्रश्न निर्माण होतात त्या – त्या वेळी आपण सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नुसते भाषणात सांगून फायदा नाही तर कृतीत आणण्याचा प्रयत्नही आम्ही करत आहोत असेही अजितदादा पवार यांनी ठणकावून सांगितले.
लोकसभा, विधानसभा निवडणुका येतील. आता एक नवे अजित पर्व उभे राहिले आहे. त्यामुळे आपली राजकीय परीक्षा घेणारा पुढचा काळ असेल.अजितदादा आवाहन करतील त्या त्या वेळी पंचायत समिती, जिल्हा परिषद ,नगरपालिका, नगरपरिषदांमध्ये आवश्यक ते बहुमत मिळवून द्यायचे आहे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांनी केले. ना. अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा घेतला व महिलांचे बळ किती उभे आहे हे दाखवून दिल्याबद्दल सुनिल तटकरे यांनी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना धन्यवाद दिले.
अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील आपला पक्ष मोठा आहे. आगामी निवडणुकीतून त्याचे मोजमाप होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत आपण क्रमांक दोनवर होतो. आता आगामी काळात पक्षाला महिलांच्या जोरावर ताकद वाढवायची आहे असं म्हणत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यासाठी सर्व समाजातील घटकाला घेऊन पुढे जावे लागेल असेही स्पष्ट केले.
अजितदादांनी आजवर घेतलेल्या कित्येक निर्णयांमुळे महाराष्ट्रातील महिलांचे जगणे सुकर झाले आहे. महाराष्ट्राची प्रत्येक महिला – भगिनी आपल्या अजितदादाच्या पाठीशी खंबीर उभी आहे. अजितदादांमुळे आज गावखेड्यात असंख्य महिला स्वावलंबी आणि आत्मविश्वासाचे जीवन जगत आहेत. हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आहे अशा शब्दात महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी महिलांच्या पंखात बळ भरण्याचे काम केले.
राज्याच्या बारा जिल्ह्यांतून आलेल्या महिलांनी त्यांच्या जिल्ह्यातील संस्कृतीचे प्रतीक म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषेत सत्कार केला. यावेळी सर्व महिलांना शपथही देण्यात आली. प्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन गीत ‘अजिंक्य भगिनी… अजित भगिनी’… यावेळी सादर केले. या गीताचे प्रकाशन ‘वन्स मोअर’ ने महिलांनी केले.
या भव्य नारी शक्ती निर्धार मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, आमदार बाबासाहेब पाटील,मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, सुरेखाताई ठाकरे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, आमदार संजय शिंदे,आमदार नितीन पवार, आमदार मनोहर चंद्रीकापुरे आदींसह राज्यातून आलेल्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.