लेखक: राजकुमार वरघट, नागपूर
७५ वा स्वतंत्रताचा अमृतमहोत्सव काही दिवसा अगोदर देशात उत्साहात साजरा केला. आपणही पांढरे वस्त्र परिधान करून मिरविलो. हर घर तिरंगा मोहिम अंतर्गत घरावर तिरंगे फडकाविले, तिरंगे हाती घेऊन देशप्रेमी रस्त्यावर उतरले, मिरवणुका काढल्या सुट्टी मजेत घालवली. स्वतंत्रता दिवस संपला आपले कर्तव्य संपले मग वर्षभर सर्व नेहमीप्रमाणे ७५ वर्षात भारताचे नागरिक म्हणून आपण आपली जवाबदारी पार पाडली काय? शंभरी कडे वाटचाल करतांना याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे कारण आपली वाटचाल “आझाद देश के गुलाम” च्या मार्गावर तर जात नाही ना हे तपासून पाहण्याची नितांत गरज आहे.
विकास झाला म्हणजे देशाने सर्व काही मिळविले असे होत नाही. देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राजकीय, सामाजिक, वैचारिक, मानसिक परिवर्तन होणे, परिपक्व होणे अनिवार्य आहे आणि आपण यात मागे पडत चाललो आहोत. राजकीय विषयावर मत व्यक्त करतांना राजकारण्यांचा विकास झाला राजकारण रसातळ्याला गेलं असे म्हणने वागवे ठरू नये राजकारणातली भाषा, स्पर्धा, ईर्षा, द्वेष, सभ्यता कुठल्या स्तरावर पोहचली हे निश्चित चिंतेचा विषय आहे. यासाठी सत्तापक्ष, विरोधीपक्ष दोन्ही सारखेच जवाबदार आहेत.
राजकारण म्हणजे मदारीचा खेळ नसून तमाशा बनला आहे. सैविधानिक पद राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनले आहे. सत्ता पक्षाला सत्तेचा माज आला आहे. विरोधी पक्ष लाचार झाला आहे आणि लोकशाहीत सर्वात महत्वाची भूमिका वठविणारे आपण ‘मतदार राजा’ भिकारी बनलो आहोत. आपल्याला विविध पार्टीचे लेबल लावून खोट्याला खोटं खऱ्याला खरं म्हणणं पार विसरून गेलो आहोत. हि कसली मजबुरी. आपल्यावर जात, धर्म, भाषा, प्रांत वरचढ ठरत आहेत जाती धर्माच्या नावावर रस्त्यावर उतरणारे आम्ही मूलभूत गरजा, आपले अधिकार, रोजगार, महागाई, आरोग्यासाठी मृग गिळून गप्प का बसतो? यालाच स्वातंत्र म्हणायचं काय? अन्नदाता शेतकऱ्यांना ऊन, पाऊस थंडीत आठ महिने बसून न्याय सोडा साधी दखल घेतली जात नसेल उलट आतंकवादी, मवाली म्हणून हिणविल्या जात असेल तर याला स्वातंत्र म्हणायचे काय? संसदेत अद्भुतपूर्व गोंधळ घालून करोडो रुपये वाया घालून जनतेत प्रश्न अनुत्तरित राहत असेल तर याला स्वातंत्र म्हणायचे काय? लोकशाहीचा एक स्तंभ मीडिया पक्षपाती पणा करत असेल तर याला स्वातंत्र म्हणायचे काय? लोकशाहीचे चार स्तंभ खिळखिळे होतांना पाहून सुद्धा आपणाला काहीच फरक पडत नसेल तर खरंच आपल्याला स्वातंत्रदिवस मनविण्याच्या अधिकार आहे काय? हा देशासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांचा अपमान नाही काय? अजूनही वेळ गेली नाही सरकारला प्रश्न विचारा, विरोधी पक्षाला जाब विचारा कारण विरोधी पक्ष लोकशाहीत सर्वात महत्वाचा घटक आहे. एक दिवस तिरंगे खांद्यावर मिरविण्यापेक्षा तिरंगा हृदयात उतरवा, एक दिवस स्वात्रंत दिवस साजरा करण्यापेक्षा वर्षभर तो आपल्या कृती ने साजरा करा. फासावर लटकून, रक्त सांडवून, अत्याचार सहन करून हे स्वातंत्र आम्हाला सोपविले आता आपले कर्तव्य आहे चला भारताला समृद्ध बनवू या.