प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 23:- आगामी काळात लोकसभा व विधानसभेची निवडणूक होणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी राजकीय पक्षांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून राजकीय पक्षांनी आपल्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
अंतीम मतदार यादी प्रसिध्दीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावित, आर्वीचे उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, नायब तहसीलदार अतुल रायपायले तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यात यशवंत झाडे, राज खेलकर, प्रवीण चौरे, प्रा.खलील खतीब, अविनाश भांडे, रविंद्र सौरंगपते, अविनाश सेलुकर, प्रमोद भोमले यांचा समावेश आहे.
दि.23 जानेवारी रोजी अंतीम मतदार यादी प्रसिध्द झाली असून मतदारांनी आपले नाव तपासून घ्यावे. अंतीम मतदार यादीनुसार जिल्ह्यात 10 लाख 81 हजार 512 एकूण मतदार असून त्यामध्ये स्त्री मतदारांची संख्या 5 लाख 30 हजार 620 तर 5 लाख 50 हजार 883 पुरुष मतदार असून 9 इतर मतदार आहेत. आर्वी विधानसभा मतदार संघामध्ये 2 लाख 56 हजार 142, देवळी विधानसभा मतदार संघामध्ये 2 लाख 62 हजार 944, हिंगणघाट विधानसभा मतदार संघामध्ये 2 लाख 87 हजार 691 व वर्धा विधानसभा मतदार संघामध्ये 2 लाख 74 हजार 725 मतदार आहेत.
अंतीम मतदार यादी मध्ये 36 हजार 395 मतदार समाविष्ट झाले तर 37 हजार 966 मतदारांची नावे कमी करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 8 हजार 11 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. 885 सेनादलातील एकूण मतदार आहेत. तसेच जिल्ह्यात 1 हजार 300 एकूण मतदान केंद्र आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
मतदार यादी अधिक सुदृढ करण्यासाठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मतदार यादीचे वाचन करण्यात आले असून मृत, स्थलांतरित व कायम स्थलांतरित मतदारांची नोंद घेऊन नावे वगळण्यात आली. भटक्या विमुक्त जमातींच्या मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 542 नव मतदारांची नोंदणी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नव मतदार नोंदणी करणे, मतदार यादीतील नावे तपासणे, वगळणे, दुरुस्ती, आधार जोडणी करुन घेणे याकरीता दि.4, 5, 25 व 26 नोव्हेंबर रोजी आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध संघटनाचे मेळावे, मोबाईल डेमो व्हॅनव्दारे जनजागृती तसेच ईव्हीएम, व्हीव्हीपॅट बाबत जनजागृती करण्यात आली.