साहित्यलेखन विषयक कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद.
अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- समाजाचा सहित्यरुपी आरसा स्वच्छ ठेवणे ही साहित्यिकांची जबाबदारी आहे. त्यामुळे साहित्यिकांनी लेखन करतांना जबाबदारीचे भान ठेवूनच लिहावे कारण ते लिखाण समाजाला दिशा देण्यासाठी असतं, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी प्रा. प्रमोद नारायणे सहयोगी प्राध्यापक यशवंत महाविद्यालय वर्धा यांनी केले. ते मातोश्री आशाताई कुणावार कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमीत्त आयोजीत दोन दिवसीय साहित्य लेखन विषयक कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते.
दोन दिवसीय साहित्य लेखन विषयक कार्यशाळेच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. उमेश तुळसकर प्राचार्य मातोश्री महिला महाविद्यालय हिंगणघाट, उद्घाटक म्हणून पांडुरंगजी तुळसकर संस्थापक अध्यक्ष विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट तर अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रा. प्रमोद नारायणे सहयोगी प्राध्यापक यशवंत महाविद्यालय वर्धा यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. सत्र उद्घाटन पुर्वी ग्रंथ पुजन व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. नयना शिरभाते उपप्राचार्य विद्या विकास महाविद्यालय समुद्रपुर यांचे हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना प्रा. प्रमोद नारायणे यांनी माह्या शेतकरी दादा… राब राबतो शेतात… साऱ्या धरतीचा भार… त्याच्या पोशिंद्या हातात… ही शेतकऱ्यांचे जीवन काव्यबद्ध करणारी उत्तम रचना सादर केली. तर अन्यायाशी झुंज आपुली…. सत्याने तू वाग रे… जाग माणसा जाग रे… जाग माणसा जाग रे… ह्या माणसांना जागे करणाऱ्या कवितेला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. मानवतेचा संदेश देताना ‘तुकडे तुकडे या मातीचे… जोडत जाऊ चला चला… माणुसकीच्या शुभ्र पताका… जोडत जाऊ चला चला’… अशी हाक दिली.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे गीत, मतदार जागृती गीत सादर करून विद्यार्थ्यांच्या मनात समाज जागृतीची जाणीव निर्माण केली. गज़ल, हज़ल, उखाणे इत्यादी काव्यप्रकार सादर करून विद्यार्थ्यांना नवनव्या प्रकारांची ओळख करून दिली. या साहित्य लेखन विषयक काव्य शाळेत प्रा. प्रमोद नारायणे यांनी उपस्थित विद्यार्थांना कविता लेखनाचे काही तंत्र सांगितले आणि विद्यार्थ्यांकडून कविता निर्मिती करुन घेतली.
यावेळी अध्यक्षीय मनोगतातून डॉ. उमेश तुळसकर यांनी समाजातील ज्वलंत प्रश्नांवर लिखाण करून समाजभान जपण्यासाठी तरूण वर्गाने आभासी जगातून बाहेर निघून साहित्याकडे वळले पाहिजे असे आवाहन केले, सदर कार्यशाळेत हिंगणघाट मधील इतर शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी प्रचंड प्रतिसाद देत उपस्थीती दर्शविली. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. अभय दांडेकर, प्रास्ताविक प्रा. अजय बिरे तर आभार प्रा. पुनम बुरिले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कला वाणिज्य व विज्ञान विभागाच्या सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थीनी सर्वांनी सहकार्य केले.