अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अनेक पालक स्वत:च्या मुलांचे व्यक्तिमत्त्व सुंदर घडावे, यासाठी महागडी फी भरून मुलांना अनेक शिबिरांना, कार्यक्रमांना पाठवीत असतात, त्यापेक्षा मुलांचे व्यक्तिमत्त्व सुंदर पद्धतीने घडावे, यासाठी त्यांना शिवरायांचे जीवन व कार्य समजावून सांगा, असे प्रतिपादन अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव निलेश गुल्हाने यांनी केले. ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेकापूर (बाई) यांच्या वतीने शाळेत आयोजित शिवजयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र खेकारे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलिस पाटील योगेश झाडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष स्नेहा थुल, सदस्य रवींद्र कावळे, सुवर्णा तडस, सामाजिक कार्यकर्ते विनोद राऊत, स्वप्नील पाटील, किशोर येरेकर, संदीप मेघरे, पवन तडस, अंकीत खेकारे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलतांना निलेश गुल्हाने यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील रांझ्याचा पाटील याला केलेली शिक्षा, तोरणा गड जिंकणे, प्रतापगडावरील पराक्रम, पन्हाळा किल्ल्यातून सुटका, शिवा न्हावी यांचे बलिदान, पावनखिंडी तील बाजीप्रभुंचा पराक्रम आदी अनेक प्रसंग कथांच्या स्वरुपात सांगितले. शिवरायांनी प्रत्येक प्रसंगात केलेले बारीक सारीक नियोजन, वापरलेल्या विविध युक्त्या आदींची तपशीलवार माहिती सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र खेकारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पाटील यांनी सुद्धा याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रम अध्यक्ष आणि इतर प्रमुख अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी वर्ग तिसरीतील कु. वैष्णवी येळणे हिने शिवजयंती निमित्य सुंदर भाषण दिले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक परमेश्वर नरवटे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन दीपाली सावंत यांनी करून मुख्याध्यापक मालती मेश्राम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमानंतर सामाजिक कार्यकर्ते पवन तडस यांच्या तर्फे सर्व 133 विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक रामकृष्ण ढबाले, श्रीमती मीरा भोयर तसेच गावातील युवा वर्ग यांनी परिश्रम घेतले.