मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चामोर्शी:- महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभिनव उपक्रमात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुनघाडा यांनी चामोर्शी तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षक पालक विद्यार्थी माजी विद्यार्थी यांच्या शाळेतील उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी आणि त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्यात आले.
सतत उपक्रमाला जानेवारी महिन्यापासून सुरुवात झाली होती यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातून जवळपास 95 टक्के शाळांनी सहभाग नोंदविला होता. टप्प्याटप्प्या नुसार विशेष अधिकारी वर्गाकडून शाळा व शाळा परिसर स्वच्छता, वर्ग सजावट, रंगरंगोटी, तंबाखू मुक्त शाळा, विद्यार्थी पूरक आहार विविध स्पर्धेचे आयोजन, वृक्ष लागवड व परसबाग जोपासना, वाचनालय, भौतिक सुविधा, माजी विद्यार्थीचा शाळेमध्ये सहभाग, बचत बँक, शाळेतील विविध उपक्रम गुणवत्ता या मुद्द्यांवर शाळांचे मूल्यांकन करून गुणदान करण्यात आले होते.
केवळ भौतिकच नाही तर शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा ही यावेळी तपासण्यात आला. यामध्ये कन्या शाळा कुनघाडा रै यांनी प्रथम केंद्रावर, आणि नंतर तालुका पातळीवर आपले अव्वल स्थान कायम ठेवलं होतं. सदर उपक्रमात शाळा तालुक्यात प्रथम आल्याबद्दल पंचायत समितीच्या चामोर्शीचे संवर्ग विकास अधिकारी सागर पाटील, गट शिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के, गुरुदास गोमासे सर केंद्रप्रमुख केंद्र कुणघाडा, अध्यक्ष मोरेश्वर गवारे शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व सदस्य यांनी शाळेचे कौतुक केले आहे.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक गौरकार मॅडम यांनी सर्व शिक्षकवृंद प्रीती नवघडे, रेखा हटनागर, गौतम गेडाम, निमाई मंडल, रोशन बागडे, विलास मेश्राम तथा शाळेतील सर्व विदयार्थीनी, शाळेच्या माजी विद्यार्थिनी तसेच सर्व पालकवृंद समस्त गावकरी यांचे आभार व्यक्त केलेले आहे.