पल्लावी मेश्राम उपसंपादक (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील रेशीमबाग परिसरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात भाजप व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘किचनकिट’ वाटप कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी प्रवेशद्वारावर झालेल्या चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात दहा ते बारा महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
शनिवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास भाजप व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १० ते १२ हजार महिला कामगार आल्या होत्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते.
या चेंगराचेंगरी मनुबाई राजपूत वय ६३ वर्ष या महिलेच्या यात मृत्यू झाला आहे. मृतक महिला हातमजुरीचे काम करीत होती. याशिवाय पुनम चांडगे वय ४३, राह. रामेश्वरी, शोभा मराम वय ४५ वर्ष रा. बजरंगनगर, नंदा गोल्हर वय ५८ वर्ष, मानेवाडा, गीता रहांगडाले वय ६० वर्ष मानेवाडा अशी जखमींची नावे आहेत. मात्र, त्यापैकी पुनम चांडगे गंभीर जखमी असून त्यांच्यावर ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, नंदा गोल्हर आणि गीता रहांगडाले या मेडिकलमधून फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, जखमींची संख्या जास्त असून त्यांची माहिती लपविण्यात येत असल्याचे समजते.
कामगार महिलांना लाभ देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने महिलांना ८ मार्च ते ११ मार्चदरम्यान ‘किचनकिट’ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी (ता.८) पहाटे पाचपासून सभागृहात कामगार महिलांनी गर्दी केली होती. कामगार कल्याणकारी मंडळाचे सहायक आयुक्त राजदीप धुर्वे यांच्यासह मंडळाचे सर्वच अधिकारी यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला सभागृहात तीन ते साडेतीन हजार महिलांना बोलावून घेण्यात आले. मात्र, बाहेर अंदाजे दहा हजार महिलांनी रांगा लावल्याचे चित्र होते.
मंडळाद्वारे सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगून महिलांना परत पाठवण्यात येत होते. किचनकिट मिळत नसल्याने महिलांनी गोंधळ घालणे सुरू केले. काही महिलांनी चक्क गेट बंद केल्यावरही त्यावरून सभागृहात जाण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळी महिलांनी अशीच गर्दी केली. अंदाजे १२ हजार महिला कामगार सुरेश भट सभागृहाच्या बाहेरील परिसरात किचनकिट मिळेल या आशेने उपस्थित होत्या. याशिवाय सभागृहाच्या आतमध्येही टेबलवर किचनकिट वाटपासाठी रांगा लावल्या होत्या.
मात्र, ढिसाळ नियोजनामुळे महिलांना एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर पाठविण्यात येत असल्याने सभागृहात गोंधळ उडाला. याशिवाय सभागृहात पाणी आणि पंख्याची व्यवस्था नसल्याने गुदमरायला लागल्याने महिलांनी बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू केला. तेव्हाच सभागृहाच्या मुख्यद्वाराजवळही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि चेंगराचेंगरीस सुरुवात झाली. त्यात मनुबाई राजपूत खाली पडल्या आणि बेशुद्ध झाल्या. याशिवाय दहा ते पंधरा जणांना गंभीर दुखापत झाली. त्यांना पोलिसांनी मेडिकलमध्ये नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ही घटना कळताच महिलांनी रोष व्यक्त केला आणि घोषणाबाजी केली.