बीडच्या आदित्य शिक्षण संस्थेच्या वार्षिक स्नेह संमेलनाचे उत्साहात उद्घाटन
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज । ऑनलाईन बीड:- कृषि विद्यापीठाने विकसित केलेले नवीन वाण, आधुनिक शेतीसाठी विकसित केलेले ड्रोन तंत्रज्ञान, कृषि औद्योगीकरणाची उपकरणे व विकसित शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विद्यापीठ व सर्व शासकीय आणि खाजगी संस्थांची कृषि महाविद्यालये महत्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी दिली.
बीड शहरातील आदित्य शिक्षण संस्थेच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या उदघाटन समारोह प्रसंगी बीड येथे आले असताना त्यांनी पत्रकांरांशी संवाद साधला. या वेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य डॉ. आदिती सारडा, कृषि विद्यापीठाचे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, आदित्य शिक्षण संस्थेचे संचालक आणि द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकचे अध्यक्ष डॉ. आदित्य सारडा, डॉ. अरुण मुंडे, डॉ. तांबे, डॉ. हिमांशू, डॉ. कुलकर्णी, डॉ. हिंगणे, डॉ. कचरे, प्रा. शाम भुतडा, प्रा, बहिरवाळ, प्रा. उमेश सत्कर, डॉ. मोरे, डॉ. खेडकर यांची उपस्थित होते.
पुढे बोलताना कुलगुरू डॉ. इंद्र मणी म्हणाले की, मराठवाड्यातील कृषि अभ्यासक्रमांची विद्यापीठातील घटक व खाजगी महाविद्यालये आता विद्यापीठाच्या बरोबरीने शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासात योगदान देण्याचे कार्य करत आहेत. कृषि विद्यापीठाकडून विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पोहोचविण्यात म्हणजेच एका अर्थाने कृषि विद्यापीठाच्या ‘कृषि विस्तार’ या भूमिकेला समर्पक कार्य करण्याबरोबरच कृषि शिक्षण देऊन दरवर्षी अनेक कृषि पदवीधर समजाला देत विद्यापीठाच्या ‘कृषि शिक्षण’ या भूमिकेला मोठ्या प्रमाणात हातभार लावत आहेत व देशाच्या अन्नधान्य साठ्यामध्ये विकसित बी-बियाणांचा वापर करून अमुलाग्र बदल केला आहे. त्याप्रमाणे साधारणत: १५ वर्षापूर्वी सुरु झालेल्या ‘आदित्य कृषि व संलग्न’ अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांच्या माध्यमातून आजपर्यंत ५००० कृषि पदवीधर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने समाजासाठी दिलेले आहेत व आज हे पदवीधर देशभर कृषि संशोधन, कृषि विकास व विस्ताराचे कार्य करत आहेत, ही उल्लेखनीय व बीड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचेही ते म्हणाले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्या डॉ. आदिती सारडा यांनी या कार्यास मोठ्या प्रमाणात सहकार्य व पाठबळ दिल्याबद्दल डॉ. इंद्र मणी यांनी डॉ. आदिती सारडा यांचे विशेष आभार मानत त्यांचे कौतुकही केले.
कृषि विद्यापीठ संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. उदय खोडके यांनी सांगितले की, मागील वर्षी आपण ‘अंतरराष्ट्रीय तृणधान्य’ वर्ष साजरे केले त्याकाळात आदित्य कृषि महाविद्यालयातील RAWE च्या विद्यार्थ्यांनी बीड जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कृषि विस्तार कार्याचे योगदान अमूल्य ठरले असल्याचे खोडके म्हणाले.
आदित्य कृषी व ईतर महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध होणार येणाऱ्या खरीप हंगामापासून विद्यापीठा मध्ये विकसित केलेली बी- बियाणे ‘आदित्य’ च्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक स्थान बळकट करण्यासाठी कृषि विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी दिली.