श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यात बीडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला आली असून बीड मध्ये भाजपच्या पंकजा मुंडे विरोधात तगडा उमेदवार देण्यात येणार आहे.
दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काल 19 मार्च रोजी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ज्योती मेटे या आज (20 मार्च) शरद पवार गटात प्रवेश करणार असून त्यांना बीडमधून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. ज्योती मेटे यांच्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीमुळे भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासमोर आव्हान उभे राहणार आहे.
भाजपाने बीड लोकसभा मतदासंघातून राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीत बीडची जागा शरद पवार गटाला सुटणार असल्याने पवार बीडमध्ये तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात होते. ज्योती मेटे यांनी आज पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमुळे बीड लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
सध्या मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढणाऱ्या मनोज जरांगे- पाटील यांनी महायुती विशेषतःभाजपाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हे लक्षात घेऊन शरद पवार गटाकडून पंकजा मुंडे यांच्या विरोधात मराठा चेहरा म्हणून ज्योती मेटे यांना पुढे करण्यात आले आहे. जरांगे यांच्या आधी विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हातात घेतला होता. ऑगस्ट 2022 मध्ये मुंबईत आयोजित मराठा आरक्षणाच्या बैठकीला येताना मेटे यांच्या गाडीला अपघात झाला आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मराठा समाजात मेटे यांच्याविषयी सहानुभूती आहे. ही सहानुभूती लक्षात घेऊन शरद पवार गटाने ज्योती मेटे यांना बीडमध्ये बळ देण्याचा निर्णय घेतला आहे.बीड लोकसभा मतदारसंघातून ज्योती मेटे यांना उमेदवारी जाहीर झाल्यास येथील लढत चुरशीची होणार आहे. 2009 पासून बीड लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या म्हणजे मुंडे कुटुंबाच्या ताब्यात आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने काँग्रेस, शिवसेनेच्या मदतीने बीडची जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे