अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील उज्वला योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या गॅस कनेक्शन मध्ये मोठा घोळ झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या उज्वला योजनेवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
केंद्र सरकारच्या उज्वला योजनेचे हिंगणघाट शहरातील लाभार्थी असलेल्या महिलेच्या नावाचे कनेक्शन दुसऱ्या कुण्या एका भिवंडी (मुंबई) येथील रहिवासी असलेल्या दिपीका दिनेश कार्लेकर या महिला ग्राहकाला देण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
हिंगणघाट शहरातील माता मंदिर वार्ड येथील सविता ईश्वर रघाटाटे या महिलेला उज्वला या शासकीय योजने अंतर्गत गॅस कनेक्शन मंजूर झाले. परंतु ही महिला आपल्या पतीसह संबंधित गॅस कनेक्शन देणाऱ्या एजन्सी मध्ये पोचली असता तिच्या नावाचे मंजूर असलेले कनेक्शन दुसऱ्या एका ठाणे जिल्ह्यातील व्यक्तीला देण्यात आले असल्याचे उघडकीस आले.
लाभार्थी सविता ईश्वर रघाटाटे यांनी मंजूर झालेले कनेक्शन तात्काळ देण्यात यावे याकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक अन्न व पुरवठा विभागाकडे मागणीचा अर्ज केला आहे. तसेच यासंबंधी पोलीस तक्रार सुद्धा करण्यात आलेली आहे. असाच प्रकार तालुक्यांतील ग्रामीण भागातसुद्धा घडला असल्याचे वितरकांनी मान्य केले असून अन्न व नागरी पुरवठा विभाग या बाबतीत काय कारवाई करणार याकडे सदर लाभार्थीचे लक्ष लागले आहे.
शिधावाटप पत्रिकेचा (RC) आर सी क्रमांकात घोळ झाल्याने हा प्रकार घडला आसल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत असून, ही दुरुस्ती झाल्यानंतरच सदर लाभार्थीला गॅस कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.