अनिल कडू, विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- जागतिक जल दिना निमित्य शहराची जीवनदायीनी वणा नदी पूजनाचा कार्यक्रम दि. 22 मार्च रोजी शुक्रवारी सकाळी 9.00 वाजता वना नदी परिसरातील संत गाडगेबाबा समाधीस्थळी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पीव्ही टेक्सटाईल जामचे महाप्रबंधक भूपेंद्र शहाणे तर प्रमुख अतिथी म्हणून जल संशोधक प्राचार्य डॉ. बालाजी राजूरकर तसेच बी आर आंबेडकर शिक्षण संस्थेचे प्रमुख अनिल जवादे, जलसंपदा विभागाचे अशोक घुमडे, माजी सैनिक कल्याणकारी मंडळ अध्यक्ष पुंडलिक बकाने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य राजुरकर सर यांनी सध्याच्या नदीचे जल प्रदुषण परिस्थितीवर, वाढती पाणी टंचाई या विषयी मार्गदर्शन केले, त्यांनी भविष्यात पाण्याची जोपासना करीत जल स्त्रोतांचे संरक्षण करणे हे मानवाचे कार्य असून येणाऱ्या पिढीसाठी पाण्याचे संगोपन करणे हे आजच्या पिढीचे अत्यावश्यक कार्य आहे, वाढते पाण्याचे प्रदूषण, रेती तस्करी, परिसरातील वाढतं अतिक्रमण यावर त्यांनी मार्गदर्शन केले. अनिल जवादे यांनी नदीचे संरक्षण करणे नदीला जिवंत ठेवणे हे महत्वाचे मानवी कार्य असून भविष्यात नदीचे पुनर्जीवन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
भूपेंद्र शहाणे यांनी नदीची पवित्रता जपण्याचे आवाहन करीत आजच्या पिढीचे हे आद्यकर्तव्य असल्याचे विषद केले, पुढे होणाऱ्या विघटनाचा सामना आपल्याला भविष्यात करावा लागेल यासाठी नदीची पवित्रता जपणे हे मानवाचं कर्तव्य आहे, याकरिता आजपासूनच आपण नदीचे संरक्षण करणे हे गरजेचे झालेले आहे, पाण्याचा कमीत कमी वापर करावा यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी वणा मातेचे पूजन करण्यात आले. यावेळी बी.आर. आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना प्रमुख सर्व उपस्थीत पाहुण्यां सोबत जल प्रतिज्ञा देण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी वणा नदी संवर्धन समितीचे अध्यक्ष रुपेश लाजूरकर, हेमंत कुलकर्णी, तूषार हवाईकर, धनराज कुंभारे,अशोक मोरे, सचिन मोरे, महेश माकडे, पंडित गुरुजी, खडकी गुरुजी, वाकडे व सर्व वना नदी संवर्धन समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत जल पूजनाचा व जल प्रतिज्ञेचा जागतिक जल दिनाच्या कार्यक्रम वना नदी परिसरात संपन्न झाला.