श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून देशभरात आदर्श आचारसहिंता लागू करण्यात आली आहे. याआचारसंहितेंत नियमांचे पालन करणे बंधनकारक असताना बीड जिल्हा पोलीस दलाकडून मात्र याला केराची टोपली दाखविण्यात येत आहे. काही महिन्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अर्चना सुरेश कुटे यांच्यासोबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे सोलापूरमध्ये काल बैठकीसाठी उपस्थितीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आचारसहिंतेच्या काळात हरिभाऊ खाडे यांना बैठकीसाठी कोणी जायला भाग पाडले हे अद्याप समोर आलेले नसले तरी आता खाडेंवर निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या दीपा मुधोळ मुंडे काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बीड जिल्ह्यात हजारो ठेवीदारांचे पैसे ज्ञानराधा मध्ये अडकले असताना पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर गुन्हा दाखल करण्यासाठी सातत्याने वेळकाढूपणा करत असल्याचे चित्र आहे. बीडमध्ये व्यापारी महासंघाने आता गुन्हा दाखल न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला असून आता तर कुटे यांना समर्थन करताना पोलिसांना आदर्श आचारसहिंतेचे ही भान राहिलेले दिसत नाही.
काल सोलापूरमध्ये झालेल्या बैठकीला बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांची उपस्थितीत होती. खाडे यांना बैठकीसाठी जायला कोणाचा दबाव होता हे अद्याप समोर आलेले नसून भाजप प्रवेश केलेल्या अर्चना कुटे यांच्यासोबत खाडे आणि स्वाभिमानी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष सचिन उबाळे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात स्पष्टपणे आचारसंहितेचे उल्लंघन होते असल्याचे दिसत आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी याप्रकरणात आता कारवाईची भूमिका कधी घेतात हे पाहणे महत्वाचे ठरले.