अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ग्रामीण क्षेत्रात भुरट्या चोऱ्यांचे प्रकार वाढत असून शेतशिवारातील ओलीता करिता मोटरपंप, केबल अशासारख्या साहित्याची चोरी होत असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त दिसून येत आहे.
पोलिसांकडून अशा किरकोळ छोट्या घटनांची दखल घेतल्या जात नसून वेळप्रसंगी तक्रारदाराला तक्रार दाखल न करण्याचा सल्ला देऊन त्याची बोळवण केल्या जाते.
हिंगणघाट शहरानजीकच्या पिंपळगाव (माथनकर) येथील शेत सर्वे क्र. २९८/२ येथे असाच प्रकार घडला. शेतकरी परमेश्वर किसनाजी बुटले या ज्येष्ठ शेतकऱ्याच्या शेतातून कॅनॉलवरून ओलितासाठी पाणी घेण्यासाठी असलेले सेक्शन पाईप,केबल व मोटर विहीरीमध्ये बांधून ठेवले होते. यापैकी अंदाजे ०७ हजार रुपये किमतीचा २०० फूट तांब्याचा केबल या भुरट्या चोरटयांनी लंपास केला.
सदर प्रकरणी हिंगणघाट पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भादंवि कलम ३७९ अन्वये नोंद केली. या परिसरात काही दारुड्या व अवैध दारू विक्रेत्यांचा वावर आहे, पोलीसांनी या समाज कंटकावरती कारवाई केल्यास या भुरट्या चोरटयां पासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल अशी मागणी गावकऱ्यानी केली आहे.