राज शिर्के मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- वंचित बहुजन आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीशी फारकत घेऊन एकला चलो रे चा मार्ग निवडला आहे. राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेत आतापर्यंत 30 हून अधिक उमेदवारांची घोषणा केली आहे. अनेक ठिकाणी जाहीर केलेले उमेदवार बदलण्याचीही वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली आहे. तर काही ठिकाणी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांनी निवडून येण्याची शक्यता दिसत नसल्याचे कारण सांगत निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये सामील न होऊन वंचित ने चूक तर नाही केली अशा प्रश्न आज अनेकांना पडला आहे.
सोलापूर येथील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल गायकवाड यांनी सोमवारी लोकसभा निवडणुक लढण्यास नकार देत माघार घेतली. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील उमेदवारानेही निवडणुकीतून काढता पाय घेत निवडणुक लढण्यास नकार दिल्याने एकच खळबळ माजली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्या उमेदवारीचा भारतीय जनता पक्षाला फायदा होईल, असे सांगत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे. यामुळे वंचित सोलापूरमध्ये नवा उमेदवार देणार की, नागपूर आणि कोल्हापूर प्रमाणेच सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देणार हे स्पष्ट झालेले नाही.
निवडून येण्याची शक्यता नाही म्हणून माघार: प्रफुल्ल लोढा जळगाव लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वीच प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही यासंबंधीची माहिती दिली असल्याचे लोढा यांनी सांगितले आहे. प्रफुल्ल लोढा म्हणाले की, मतदारसंघातील परिस्थिती पाहिली असता, वंचितचा विजय होणार नाही हे लक्षात आल्यामुळे निवडणुकीतून माघार घेत आहे.
प्रफुल्ल लोढा यांच्यावर कोणाचा दबाव आहे का, असे त्यांना विचारले असता लोढा म्हणाले की, कोणाचाही माझ्यावर दबाव नाही. मी कोणाच्या दबावात देखील येणारा नाही. माझ्या मनाला जे वाटले तो निर्णय मी घेतला आहे. माझ्या लक्षात आले की आपण जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाही, त्यामुळेच माघार घेतली आहे.
सोलापूर आणि जळगाव मधील उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण असणार किंवा पक्षा कोणाला पाठिंबा देणार या संबंधी लवकरच माहिती देण्यात येईल असे पक्षाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.