श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यातील राजकीय समीकरणं बदलली तसं बीडमध्ये सगळेच दिग्गज लोकसभा निवडणुकीसाठी एकाच म्हणजेच भाजपच्या पंगतीत येऊन बसले. मात्र भाजपच्या उमेदवारासाठी खेळली जात असलेली लढाई. आता नेत्यांच्याच अंगलट येऊ लागली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा बनलेला आहे. त्यातच ज्याच्यासाठी लढायचं आहे तोच संशयाने पहात तर आहेच शिवाय स्वतःच्या जवळचे मानले जाणारे मतदार देखील विरोधात जाऊ लागले आहे.अशातच जनाधार कमी होत असल्याने नेत्यांना फुकट्या श्रेयाच्या मागे पळताना स्वतःची इज्जत संभाळत राजकीय जमीन वाचवायची वेळ आल्याचं पाहायला मिळत आहे. तर जसजशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे तस तसं भाजपची नौका राजकारणाच्या समुद्रात गोते खाऊ लागल्याने बजरंग सोनवणे यांचे पारडे जड होऊ लागले आहे.
बीड जिल्ह्यात विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेते ज्यावेळी एखाद्या राजकीय पक्षाच्या समर्थनासाठी एकत्र येतात. त्या त्या वेळी जनतेने त्यांची कुवत दाखवून दिली आहे. इतिहासाचा हाच मुद्दा पकडत पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील सगळेच नेते माझ्या मंचावर आहेत त्यामुळे मला भीती वाटते अशी शंका उपस्थित करत मंचावरील नेत्यांबाबत संशयी भूमिका तर घेतलीच शिवाय या नेत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतःची यंत्रणा कामाला लावली. पंकजा मुंडे च्या छावणीत सगळेच रथी महारथी गोळा झालेले असले त्यांनी पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली असली तरी या नेत्यांना आपलीच पायाखालची जमीन सरकू लागली आहे असा भास वारंवार होऊ लागला आहे. त्याला कारणही तसेच आहे. मराठा आरक्षणामुळे सगळी समीकरणे बदलली गेली आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना पाडा असे आवाहन केलेले आहे. समाजाचा रोष घ्यायचा तोही दुसऱ्यासाठी बरं तो घेऊनही येणाऱ्या काळामध्ये श्रेय कुणाच्या पारड्यात पडेल हा मोठा प्रश्न प्रत्येक मतदारसंघातील विधानसभा लढवू इच्छिणाऱ्याच्या नेत्यांपुढे निर्माण झाला आहे. भविष्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यामध्ये एकत्रितपणे निवडणूक लढली जाईल की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. एकत्रित लढली गेलीच तर उमेदवारी आपल्याला मिळेल की नाही हा मोठा प्रश्न या नेत्यांपुढे निर्माण झालेला आहे.
गेवराई मतदार संघाचे उदाहरण घेतलं तर भाजपचे विद्यमान आमदार बाळराजे पवार, तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित अमरसिंह पंडित यापैकी कोणाचे उमेदवारीसाठी भवितव्य ठरणार? असा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे. तीच स्थिती बीडमध्ये देखील आहे. भाजपचे राजेंद्र मस्के यांना पंकजा मुंडे यांनी आमदार करण्याचे वचन यापूर्वीच दिलेले आहे. तर शिंदे गटाचे कुंडलिक खांडे देखील गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. तीच स्थिती आष्टी पाटोदा केज माजलगाव या ठिकाणी देखील निर्माण झाली आहे. दरम्यान पक्क्या उमेदवारीसाठी परळीचे विधानसभेचे चित्र स्पष्ट व खात्रीचे आहे. उर्वरित नेत्यांचे भविष्य अंधारातच आहे तर मग एखाद्यासाठी आपण बळीचा बकरा का बनायचं असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे राजकारणातील धुरंदर समजले जाणारे व बुद्धिवादी असलेले सुरेश नवले यांनी वेळीच या खेम्यातून माघार घेत बजरंग सोनवणे यांना समर्थन दिले. अशीच काहीशी घालमेल करणारी मनस्थिती जिल्ह्यातील पंकजासाठी झटणाऱ्या नेत्यांची झाली आहे.
समाजाचा रोष घेत फुकट्या श्रेयासाठी आपला बळी तर जाणार नाही. अशी भीती निर्माण झाल्यामुळे अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे च्या नौकेत बसलेला प्रत्येक नेता शरीराने व्यासपीठावर हजर असला तरी पूर्ण ताकतीने लढत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे बदललेल्या सामाजिक परिस्थितीमूळे पंकजा मुंडे यांची नौका राजकारणाच्या सागरातील भोवऱ्यात गोते खाऊ लागली आहे. जहाज बुडून जाण्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे नौकेतील नेते नौके बाहेर उडी मारण्याच्या मनस्थितीत देखील पोहोचले आहेत. दरम्यान जसजशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे. तसतशी उडी मारणारांची संख्या वाढण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करू लागले आहेत. एकंदरच बजरंग सोनवणे व संदीप क्षीरसागर यांनी मोजक्याच मावळ्यांना सोबत घेत खेळलेली ही लढाई विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचं पाहायला मिळत आहे.