हिंगोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगोली:- कळमनुरी तालुक्यातील मसोडफाटा येथील शेत शिवारातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे आज सकाळी एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती तपासाअंती पोलिसांनी दिली. तसेच पोलिसांनी संशयित म्हणून मयताची पत्नी व तिच्या दोन प्रियकरांना ताब्यात घेतले आहे.
कळमनुरी तालुक्यातील शिवणी (खुर्द) येथील शेतकरी नामदेव तुकाराम मिरासे वय 45 वर्ष यांचे गावापासून काही अंतरावर असलेल्या मसोडफाटा शिवारात शेत आहे. रविवारी रात्रीच्या वेळी नामदेव मिरासे हे त्यांच्या शेतात गेले होते. 3 जून रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास गावातील काही तरुणांनी नामदेव मिरासे यांचा मृतदेह रस्त्यालगत शेतात पडून असल्याचा पाहिला. त्यांनी लगेच पोलिसांना याबाबत माहिती दिली..
यानंतर पोलिस निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक गजानन कांगणे, जमादार माधव भडके, देवीदास सूर्यवंशी, माधव डोखळे, शकुराव बेले, रामा शेळके, शिवाजी देमगुंडे, प्रशांत शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली. त्यानंतर सदर मृतदेह तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी तीन आरोपींना ठोकल्या बेड्या..
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष भूमिका बजावून चार तासाच्या आत खुनाचा उलगडा करून ३ आरोपींना अटक केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार नितीन गोरे, नरेंद्र साळवे, आजम प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, पोलिस उपनिरीक्षक गजानन कागणे विमल होगे, पोले आदींच्या पथकाने तपासाकामी सहकार्य केले.