राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या त्यात राज्यातील जनतेने लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला असून, भाजपा प्रणित महायुतीला राज्यात 17 तर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार व शिवसेना ठाकरे यांच्या पक्ष असलेल्या महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या आहेत. लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर राज्यातील काही राजकीय समीकरणं बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे काही आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकी दरम्यान आणि लोकसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना शिंदे गटाच्या 6 आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पक्ष फुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध करणं टाळलं किंवा ठाकरेंच्या विरोधात कुठल्याही प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहून सुद्धा तटस्थ भूमिका ठेवली, अशा आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत एकूण 6 आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटात घेत असताना ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली, त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रामुख्यानं ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘6 ते 7 हा आकडा कुठून आला मला माहिती नाही, पण हा आकडा 16 ही असू शकतो, 20 सुद्धा असू शकतो किंवा 40 देखील असू शकतो. कारण ज्या लोकांना वाटलं की, आता आमचंच सरकार राहणार आहे, आता आम्हीच निवडून येणार आहोत, ज्यांनी शपथ घेऊन सांगितलेलं आता एकाही आमदार-खासदाराला मी सोडू देणार नाही, आता निकालानंतर अस्वस्थता वाढणारच, त्यांच्या मतदारसंघात, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावण झालं आहे. याचा पश्चाताप त्यांना होत असेल तर ते ती संख्या सहा नाही, तर 10 किंवा 20 असू शकते.”