मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील पेरमिली परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेली विजेची अडचण सोडविण्यासाठी नवीन वीज उपकेंद्र मंजुर करण्यात आले. नुकतेच अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते ३३/११ केव्ही नवीन वीज उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे पेरमिली परिसरात विजेचा लपंडाव कायमचा थांबणार आहे.
सध्या पेरमिली परिसरातील ४० ते ४५ गावांना भामरागड उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जात आहे.भामरागड ते पेरमिली पर्यंत येणारी वीज वाहिनी जवळपास दीडशे किलोमीटर पेक्षा जास्त आणि घनदाट जंगलातुन आल्याने नेहमीच या परिसरात विजेचा लपंडाव होत असतो. कमी दाबाचा वीज पुरवठ्याची समस्या तर कायमचीच आहे.पावसाळ्यात तर नेहमीच बत्तीगुल होत असल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पेरमिली येथे आदिवासी उपाययोजने अंतर्गत ३३/११ के व्ही मंजूर करण्यात आले.
२६.७४ कोटी रुपयांच्या निधीतून या ३३/११ केव्ही उपकेंद्राचे काम केले जाणार आहे त्यासाठी भूखंड क्र.५४/१/१ ही जागा वन विभागाने मंजूर केले आहे. या उपकेंद्राची क्षमता ५ एम व्ही ए राहणार असून या उपकेंद्रातून ११ केव्ही चे ३ वीज वाहिनी राहतील.विशेष म्हणजे या उपकेंद्राकरिता १३२ केव्ही आलापल्ली उपकेंद्रातून आणि ६६ केव्ही उपकेंद्रातून असे दोन ३३ केव्ही वीज वाहिन्या प्रस्तावित केलेले आहे. सदर काम पूर्णत्वास आल्यास या परिसरातील बहुतांश गावातील विजेची समस्या सुटणार आहे. एवढेच नव्हे तर भामरागड उपकेंद्रावरील भार देखील कमी होणार आहे. त्यामुळे पेरमिली परिसरातील गावांसह भामरागडला देखील मोठा दिलासा मिळणार.
३३ केव्ही उपकेंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, मुख्य अभियंता सुधीर हेडाऊ, गाव पाटील विठ्ठल मेश्राम, सत्यनारायण येगोलपवार, देवाजी सडमेक, बालाजी गावडे तसेच पेरमिली पट्टीतील बहुतांश नागरिक तसेच महावितरणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.