अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अश्वघोष कला व सांस्कृतिक मंच वर्धा द्वारा आयोजित लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या राज्यस्तरीय बुद्ध-भीम गीत गायन स्पर्धेत सुरेंद्र डोंगरे प्रथम, नागपूरचा प्रतीक म्हैसकर द्वितीय तर वर्धेची सानिका बोभाटे तृतीय ठरली. तसेच आठ प्रोत्साहन बक्षीसे अनुक्रमे आयुष मानकर नागपूर, तेजस्विनी खोडकर नागपूर, मयूर पटाईत वर्धा, अपर्णा दर्डे गडचिरोली, संतोष तायडे वर्धा, लाजरी भुरे नागपूर व दिव्या शेंडे यवतमाळ या गायकांना देण्यात आले.
प्रथम क्रमांकाचे 15 हजार रुपयाचे बक्षीस महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार प्राप्त प्रशांत जारोंडे यांचे कडून, द्वितीय क्रमांकाचे 10 हजार रुपयाचे बक्षीस डॉ. मोहन राईकवार यांचे वतीने तर तृतीय क्रमांकाचे पाच हजार रुपयाचे बक्षीस गौतम पाटील यांचे तर्फे देण्यात आले. शिक्षण महर्षी अनिल जवादे यांचे वतीने सात हजार रुपयाचे प्रोत्साहन बक्षीस दिले. तसेच 1500 रुपयाचे प्रोत्साहन बक्षीस प्राचार्य मिलिंद सवाई यांचे वतीने देण्यात आले.
वर्धा येथील विद्यादीप सभागृहात दुसऱ्या बुद्ध भीम गीत स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी लक्ष्मीनारायण सोनवणे यांचे हस्ते डॉ. मोहन राईकवार यांच्या अध्यक्षतेखाली व इंजि. राजेश खडसे, गौतम पाटील तथा स्पर्धेचे मुख्य आयोजक संविधान हस्तलिखितकार लिमका बुक वर्ल्ड रेकाॕर्ड प्राप्त धनंजय नाखले यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी निवड समितीने प्राप्त 85 व्हिडिओ मधून 50 स्पर्धकांची गायनासाठी निवड केली होती. या 50 स्पर्धकांनी प्रत्यक्ष गायन केले त्यामधून सर्वोत्तम अकरा स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली. यामधून प्रथम क्रमांक वर्धेचा सुरेंद्र डोंगरे, द्वितीय क्रमांक नागपूरचा प्रतीक म्हैसकर तर वर्धेची सानिका बोभाटे तृतीय ठरली. या स्पर्धकांना अनुक्रमे पंधरा हजार, दहा हजार व पाच हजार रुपयाचे बक्षीस व स्मृतिचिन्ह देण्यात आले.
अंतिम स्पर्धेतील विजेत्यांना राष्ट्रीय प्रबोधनकार प्रकाशनाथ पाटणकर, नागपूर यांचे हस्ते बक्षीस देण्यात आले. बक्षीस वितरण समारोहाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक प्रशांत दारोंडे, शिक्षण महर्षी अनिल जवादे, इंजि. अनिल इंगळे, भंते राजरत्न, ठक्कर सेवा संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण सोनवणे, माजी शिक्षणाधिकारी धनराज तेलंग व स्पर्धेचे मुख्य आयोजक धनंजय नाखले यांची उपस्थिती होती.
यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त राजू थुल, नववैज्ञानिक तनय नाखले, पेन्शन मधून नेहमी दान करणाऱ्या कमल भगत, कमल कांबळे, प्रकाश जिंदे व संजय मोडक यांचा स्मृतिचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेच्या प्रथम फेरीचे परीक्षण श्याम सरोदे, केतकी कुलकर्णी व आनंद निधेकर यांनी केले. तर द्वितीय स्पर्धेचे परीक्षण खुशबू कठाने, आकाश चांदुरकर व नितीन वाघ यांनी केले. तर गायन स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रख्यात सूत्रसंचालक साहिल दरणे यांनी केले. बक्षीस वितरण कार्यक्रमात राष्ट्रीय प्रबोधनकार प्रकाशनाथ पाटणकर यांनी ‘ वो बात करो पैदा, तुम अपनी जुबानों में ‘ व ‘ खोदा अयोध्येची धरती, मिळेल बुद्धाची मूर्ती ‘ या गीताचे गायन करून श्रोत्यांची मने जिंकली.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश वाणी, प्रास्ताविक प्रकाश कांबळे; तर आभार मुख्याध्यापक मुकुंद नाखले यांनी मानले. समारोपीय व बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन गौतम पाटील व सुनील ढाले यांनी तर प्रास्ताविक स्पर्धेचे मुख्य आयोजक धनंजय नाखले आणि आभार प्रणोज बनकर यांनी मानले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नीरज गुजर, प्राचार्य डॉ.चंदू पोपटकर, प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई, मुन्ना नाखले, संजय मोडक, प्रकाश शिंदे, ताराचंद म्हात्रे, डॉ. रामकृष्ण मिरगे, शैलेश निकोसे, उमेश गायकवाड, डॉ. प्रदीप थुल, प्रवीण जंगले, डॉ. अरविंद पाटील, प्रदीप लोखंडे, रमेश जोगे, शैलेश कदम, मोहन शेवाळे, निखिल जवादे, राजेश कोल्हे, सुनील सुटे, राजकुमार वासेकर, जगदीश भगत, गौतम फुलमाळी, किशोर मस्के इत्यादींनी प्रयत्न केले.