✒️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
शेवगाव:- तलवारीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना शेवगाव तालुक्यात घडली असून पीडितेने विषारी औषध घेऊन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. याबाबत शेवगाव पोलिसांनी सचिन नानासाहेब काटे वय 28 वर्ष या आरोपीस अटक केली आहे. शेवगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस तोंड दाबून तलवारीचा धाक दाखवत तुला आणि तुझ्या बहिणींना मारुन टाकील, अशी धमकी देत एका खोलीच्या बाहेर आणले. दुसर्या खोलीला आतून कडी लावली. त्या खोलीत कोंडून तलवारीचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
4 सप्टेंबरच्या रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला आणि तुझ्या आई-वडिलांना मारून टाकील, अशी धमकीही दिली. या घटनेनंतर पीडितेला किळस वाटू लागली. त्यामुळे तिने घटनेच्या दुसर्या दिवशी विषारी औषध घेतले. मात्र पीडितेने विष घेतल्याचे तत्काळ लक्षात आल्याने तिला तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मुलीची प्रकृती सुधारत आहे.
या प्रकरणी पीडितेच्या जबाबावरुन शेवगाव पोलिसांनी एकाविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहेत.