उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्ह्यातून एक अपघाताची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील कुरणखेड येथे पोलीस उपनिरिक्षकाला (PSI) कारने जोरदार धडक दिली यात बोरगावमंजू पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. उपनिरीक्षक मोरे हे बोरगाव येथून मूर्तिजापूर कडे जात असतांना हा भीषण अपघात झाला. मोरे हे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यावेळी पोलिसांनी अपघात झालेली चारचाकी गाडी ताब्यात घेतली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पीएसआय राजेंद्र मोरे बोरगाववरून मूर्तिजापूरच्या दिशेने जात होते. दरम्यान कुरणखेड येथे असताना आलेल्या भरधाव कारने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की ते रस्त्यावर जोरात आपटले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यांने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कार अकोल्यातीलच असून नागपूरवरून अकोल्याकडे येत होती.
पीएसआय राजेंद्र मोरे अकोला येथे कुटुंबासह रहात होते. आपल्या दुचाकीने दररोज अकोल्यातून बोरगावमंजू पोलीस ठाण्यात येत होते. त्यांना दोन लहान मुले असून त्यांच्या आकस्मिक मृत्यूने ती मुले पोरकी झाली आहेत. अचानक घडलेल्या या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.