✒️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी:- अहमदनगर जिल्हातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी राहुरी पोलिसांशी हुज्जत घालताना खोटी माहिती देताना दोन महिलांनी पेट्रोल आणून पेटवून घेण्याचा अघोरी प्रयत्न केला.
दरम्यान, याप्रकरणी पेट्रोल आणून देणार्यासह दोघींविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. प्राजक्ता मुजफ्फर शेख, गुलशन खुर्शीद शेख व समीर इब्राहिम पटेल सर्व रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी तक्रारीत म्हटले आहे की, दि.18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7ः55 वाजेच्या सुमारास राहुरी पोलिस ठाण्याच्या आवारात प्राजक्ता हिने खोटी माहिती देत पोलिसांनी तिच्या नातलगांवर कारवाई करावी, असा दबाव निर्माण केला. यावेळी पोलिसांशी हुज्जत सुरू असताना समवेत असलेल्या समीर पटेल याच्याकडून पेट्रोल सदृष्य बाटली व आगपेटी हातात घेत स्वतःच्या अंगावर बाटली ओतताच पोलिसांसह गुलशन हिने तिला रोखले.
मात्र ‘आता मी पेटवून घेते,’ असे म्हणणार्या त्या महिलेचा पेटवून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. यावेळी उपस्थितांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील यांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोके करीत आहेत.