प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 17:- कुटुंबातील एक महिला शिक्षीत असली तर संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करण्याचे काम करते. महिला कुटुंबासाठी सकाळ पासूनच कष्ट करण्यास सुरूवात करते. मात्र ती कधी तक्रार करित नाही. जिल्ह्यात बचत गटांची मोठी चळवळ उभी आहे. त्यामाध्यमातून महिलांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन आमदार डॉ. पंकज भोयर त्यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जिल्हास्तरीय कार्यक्रम सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनिल मेसरे, बालविकास प्रकल्प अधिकारी के.पी.कटरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आमदार डॉ. भोयर पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी महिलांना प्राधान्य देवून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. खऱ्या अर्थाने अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ऑनलाइन सेवा केंद्र आदींनी मेहनत घेऊन कमी कालावधीमध्ये महिलांची नोंदणी केली. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महिलांना लाभ मिळणार आहे. ज्या पात्र महिलांनी अद्यापही अर्ज केला नसेल त्यांनी लवकर अर्ज करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी श्री. कर्डिले म्हणाले, शासन निर्णय आल्यानंतर खुप कमी कालावधीमध्ये योजना कार्यान्वित झाली. यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर दाखले निर्गमित केले. या योजनेचा फायदा महिलांना होणार असून आरोग्य, शिक्षण व कुटुंबाच्या खर्चामध्ये नक्कीच मदत होणार आहे. कमी कालावधीत योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. याबद्दल महिला व बालविकास विभाग, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचे त्यांनी अभिनंदन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान म्हणाले, तीस ते चाळीस दिवसात शासन व प्रशासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे केली. त्यामुळेच कमी कालावधीत योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लाभ मिळण्यास सुरूवात झाली. महिलांनी मिळालेले पैसे परिवाराच्या विकासासाठी वापरावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुणे येथून राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनिल मेसरे यांनी मानले