अक्षय अरुण म्हात्रे पेण तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन रायगड:- अविष्कार फाउंडेशनचा विभागाच्यावतीने देण्यात येणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ 2023-24, रायगड जिल्हा परिषद शाळा बोरी ता. पेण येथे प्राथमिक विभागात कार्यरत असलेले शिक्षक उज्वल चांगदेव म्हात्रे यांना देण्यात आला. पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या उज्वल म्हात्रे यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. रायगड जिल्हा परिषद शाळा बोरीचे मुख्याध्यापक श्री. जितेंद्र म्हात्रे सर तसेच विषय शिक्षक पांडुरंग म्हात्रे, नूतन पाटील मॅडम यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
रायगड येथील कुणबी भवन माणगाव येथे अविष्कार फाउंडेशन च्या वतीने 22 सप्टेंबर रोजी ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ सोहल्याचे आयोजन केले होते. जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे तसेच भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वडिलांकडून विद्येचे बाळकडु मिळालेले हे गेली 18 वर्ष रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 18 वर्ष अखंडपणे आपले ज्ञानदानाचे कार्य सुरु ठेवले आहे. केवळ एक शिक्षक म्हणूनच नाही तर समाजाप्रति असणार्या तळमळीतून त्यांनी अनेक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. विद्यार्थी पालक-भेट, माजी विद्यार्थी भेट घडवून कौटुंबिक संबंध जोडले. सर्व विषय त्यांनी खेळीमेळीने शिकवून विद्यार्थ्यांना त्यात रुची निर्माण केली. शालेय विषयांव्यतिरिक्त त्यांना असलेली संगिताची आवडही त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून जोपासली व विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव दिला.
समाज आणि विद्यार्थ्यांनी नेहमीच उज्वल सरांना आदर्श मानले आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे आता अविष्कार फाउंडेशने त्यांच्या कार्यावर यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराची मोहोर उमटवली आहे. संगीत, कला, क्रीडा यासारखे सर्व गुणसंपन्न असलेल्या या व्यक्तिमत्त्वाला आदर्श शिक्षक व गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळणे म्हणजे दुग्धशर्करायोगच आहे. मुळचे मौजे शिर्की (ता.पेण) रहिवाशी असलेल्या उज्वल म्हात्रे यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे पेण तालुक्याच्या शिर्की विभागात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.