जयभीम नगर झोपडपट्टी तोडक कारवाई प्रकरणी मुजोर अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे: नसीम खान
राज शिर्के, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- दि. ४ ॲाक्टोबर २०२४ मुंबई महानगर पालिका आणि पवई पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यानी बिल्डरशी संगनमत करून 6 जूनच्या पहाटे जयभीम नगरमधील गरीब कुटुंबांच्या घरावर कारवाई करून त्यांना बेघर केले. या कारवाईतील बीएमसी अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करून पोलीस उपायुक्त, एस वार्डचे वार्ड अधिकारी, पालिका उपायुक्त आणि पवईच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, या मागणीचा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व CWC सदस्य नसीम खान यांनी पुन्नरुच्चार केला आहे.
यासंदर्भात बोलताना नसीम खान म्हणाले की, अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली नियमबाह्य कारवाई करून पवईच्या जयभीम नगर मधील ६०० कुटुंबियांना भर पावसाळ्यात बेघर करण्यात आले. यासंदर्भात एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते, आज एसआयटीच्या अहवालावर सुनावणी करताना कोर्टाने या मुजोर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गरीब कुटुंबाना न्याय मिळेल असा विश्वास नसीम खान यांनी व्यक्त केला. महानगरपालिका एस वार्डचे अधिकारी, पवई पोलीस स्टेशनचे अधिकारी, स्थानिक बिल्डर आणि स्थानिक नेत्यांनी हातमिळवणी करून सरकारच्या संरक्षणाखाली ६०० कुटुंबाना नियमबाह्य पद्धतीने बेघर करून रस्त्यावर आणले होते. या विरोधात काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या मुद्द्याकडे त्यांचे लक्षही वेधले होते. या प्रकरणी राज्यपाल महोदयांची भेटही घेतली होती. या गरीब कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरुच राहिल असेही नसीम खान म्हणाले.