युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्हातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पेंच नदीच्या कालव्यावर फिरायला गेलेल्या 8 विद्यार्थ्यांना नदीच्या कालव्यावर पोहण्याचा मोह आवरता आला नाही. ते सर्व जण कालव्यात आंघोळीसाठी उतरले असता चार विद्यार्थी पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेली. त्या चारही विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर चार विद्यार्थी थोडक्यात बचावली आहे. घटना सोमवारी दुपारी 5.00 वाजताच्या सुमारास घडली. मनदीप पाटील वय 17 वर्ष, मयंक मेश्राम वय 14 वर्ष, अनंत साबारे वय 13 वर्ष आणि मयूर बागरे वय 15 वर्ष अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत. या विद्यार्थ्यांच्या मृतदेहाचा शोध अद्यापही लागला नसून शोध मोहीम राबविण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, रामटेक जवळ असलेल्या बोरी गाव (घोटी टोक) असून येथे इंदिरा गांधी उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय आहे. येथे पाचवी ते १२ वी पर्यंतची मुले शिकतात. त्या शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची सोय आहे. बोरीमध्ये असलेल्या वसतीगृहात जवळपास ६० मुले राहतात. १४ ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शाळेला सुटी होती. त्यामुळे आठवी ते दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांनी वसतीगृहाच्या काही मिटर अंतरावरुन गेलेल्या पेंच नदीच्या कालव्यावर फिरायला जाण्याचा बेत आखला. दुपारी 4.00 वाजताच्या सुमारास 8 विद्यार्थी फिरायला निघाले. ते 4.30 वाजता कालव्यावर पोहचले. तेथे विद्यार्थ्यांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे 8 जण कालव्यात आंघोळ करण्यासाठी उतरले. मयंक मेश्राम, अनंत साबारे आणि मयूर बागरे हे तिघे जणांना पोहणे येत नसतानाही फक्त मित्रांवर छाप पाडण्यासाठी खोल पाण्यात गेले. कालव्यातील पाण्याचा प्रवाहात वाहून जात होती. त्यामुळे सर्वात मोठा असलेल्या मनदीपने त्या तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मित्रांना वाचविण्याच्या नादात मयूरने मनदीपचा हात पकडल्यानंतर तोल जाऊन दोघेही वाहून गेले. चारही मित्र वाहून जात असल्याचे बघून उर्वरित चौघे लगेच पाण्याबाहेर निघाले. त्यांना मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, जंगल परिसर असल्यामुळे मदतीसाठी कुणीही धावून आले नाही. त्यामुळे चौघांचाही पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला.
चारही मित्र कालव्यात वाहून गेल्यामुळे भेदरलेली चारही मुले वसतीगृहात परत आली. त्यांनी वसतीगृहाच्या अधीक्षकांना चार मुले कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती दिली. त्यांनी लगेच रामटेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांना माहिती दिली. ते ताफ्यासह कालव्यावर पोहचले. त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांची मदत घेतली. चारही मुलांचे मृतदेह अद्याप सापडले नसून शोध सुरु आहे.