राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. त्यामुळे समाजाला धम्म समजून घेण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवावे लागतील. धम्म परिषदा घ्याव्या लागतील. त्यातून चांगल्या प्रथा चालू ठेवणे व चुकीच्या प्रथा बंद कराव्या लागतील. वर्षावास काळात आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करतो. माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पूज्य भदंत शांतीरत्न यांनी केले. धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार व्यवस्थापन समिती व वंदना ग्रुप यांच्या वतीने आयोजित आश्विन पौर्णिमा तथा वर्षावास समाप्ती कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामदेव पार्क येथील धम्म सम्राट अशोक बुद्ध विहाराला परिक्रमा घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. भदंत कीर्तिपियो नागसेन यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले. दरम्यान तीन महिन्याचा वर्षावास काल यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या धम्मसेवकांचा भदंत कीर्तिपियो नागसेन यांच्या हस्ते पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा. उत्तम भगत यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार व्यवस्थापन समिती पदाधिकारी व वंदना ग्रुपच्या सर्व धम्म सेवकांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला मिरा भाईंदर मधील धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.