संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना राजुरा विधानसभा मतदारसंघातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे अज्ञात व्यक्तींने मतदान ऑनलाईन नोंदणीद्वारे 6 हजार 853 बनावट मतदारांची नावे समाविष्ठ केल्याचे समोर आल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ माजली आहे. ही सर्व नावे निवडणूक विभागाने रद्द करून शनिवारी दि.19 ऑक्टोंबर रोजी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणांतील दोषींचा शोध घेऊन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पोलिस विभागाला दिले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नवीन मतदाराची नाव नोंदणी अभियान सुरू आहे. त्यात राजुरा विधानसभा मतदार संघात येणाऱ्या राजुरा, कोरपना, जिवती आणि गोंडपिपरी तालुक्यांतून 3 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन स्वरुपात नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 6 हजार 853 अर्जांमध्ये अर्जदाराचा फोटो, जन्मतारीख व रहिवासीचा पुरावा, अर्जात नमूद नाव व पुरावा हा वेगवेगळया व्यक्तींचा हाेता.
हेल्पलाइनचा घेण्यात आला गैरफायदा: व्होटर हेल्पलाइन ॲप किंवा एनव्हीएसपी याद्वारे ऑनलाइन स्वरूपात अर्ज आले होते. भारत निवडणूक आयोगामार्फत ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु, या सुविधेचा गैरफायदा घेऊन काही अज्ञात व्यक्तींनी मतदाराचे बनावट मतदार नोंदणी अर्ज भरल्याचे उघडकीस आले आहे.