पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राज्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनीस अहमद यांनी काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी प्रवेश करत वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी स्वीकारली खरी मात्र आज नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी त्यांना 1 मिनिट उशीर झाला, दार बंद झाले आणि ते नामांकन भरण्यापासून वंचितच राहिले.
माजी मंत्री अनीस अहमद हे बराच वेळ ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्य नागपूर निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालया समोर ठिय्या देत, फोनाफोनी करीत बसले होते. त्यामुळे त्यांचा गेम झाला की, त्यांनी जाणीवपूर्वक ही चूक केली यांची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली आहे.
राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते अनिस अहमद यांनी सोमवारी वंचित बहुजन आघाडी प्रवेश केला. ऍड प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे स्वागत करीत पक्ष प्रवेश करून त्यांना मध्य नागपूरची उमेदवारी दिली होती. मात्र, इतक्या अनुभवी राजकारणी व्यक्तीची ही संधी हुकली की जाणीवपूर्वक त्यांनी ती चुकवली याविषयीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकप्रकारे त्यांची अर्ज दाखल करण्याची संधी आज मंगळवारी हुकल्याने मध्य नागपुरातील राजकारण, विजयाचे गणित बदलण्याची शक्यता आहे. काँग्रेसतर्फे बंटी शेळके तर भाजपतर्फे माजी महापौर प्रवीण दटके प्रमुख उमेदवार असून हलबा, मुस्लिमबहुल अशा या मतदारसंघात मतविभाजन अटल आहे.
हे माझ्या विरोधात षडयंत्र : अनिस अहमद
मला वारंवार ठिकठिकाणी रोखण्यात आले. मी दुपारी 3 वाजता पूर्वीच कार्यालयात पोहोचलो होतो. मी विजयी होणार असल्याने आपल्याला जाणीवपूर्वक उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून रोखण्यात आले. 1999 साली केवळ 6 मतांनी पराभूत झालो होतो त्यावेळी देखील माझी पुनमोजणीची मागणी फेटाळली गेली असे आरोप अनीस अहमद यांनी केले.