राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता बदलापूर नंतर दि. 6 नोव्हेंबरला उल्हासनगरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
उल्हासनगरात एका इमारतीच्या नेपाळी वॉचमनच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी 18 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली. आरोपाला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे.
उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीत एक नेपाळी तरुण वॉचमन म्हणून काम करतो. इमारतीच्याच आवारात एका खोलीत तो कुटुंबासह वास्तव्याला आहे. शनिवारी 2 नोव्हेंबर रोजी हा नेपाळी वॉचमन इमारतीची साफसफाई करत होता. त्यावेळी त्याला आपल्या खोलीतून लहान मुलीचा रडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्याने घराकडे धाव घेत पाहिले तर एक तरुण तिथून पळून जाताना दिसला.
आपल्या मुलीवर तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा पाहून बापाला धक्का बसला. वॉचमनची पत्नी घराबाहेर गेली होती. घरामध्ये कुणी नसल्याचा फायदा घेत तरुणाने चिमुकलीसोबत हे कृत्य केले. वॉचमनने तात्काळ पत्नीला बोलावून घेतले. दोघांनी आपल्या मुलीची विचारपूस केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ आपल्या मुलीला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णालयात नेले.
डॉक्टरांनी तपासणी करून चिमुकलीवर बलात्कार झाल्याचे सांगितले. हे ऐकून चिमुकलीच्या आई-वडीलांना धक्का बसला. याप्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता याप्रकरणी गुन्हा दाखल करत तातडीने तपासाची चक्रं फिरवली. अवघ्या 2 तासांत 18 वर्षीय नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर उल्हासनगरात घडलेल्या या घटनेमुळे शहर हादरून गेले आहे.