मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अहेरी विधानसभा मतदार संघात हाईहॉल्टेज ड्रामा बघायला मिळत आहे. अहेरी विधानसभा मतदारसंघ आत्राम या राज परिवाराचा पारंपारिक मतदार संघ आहे. दक्षिण गडचिरोलीतल्या आदिवासी मतदारांवर प्रभाव असलेल्या या आत्राम राजघराण्यातील एक नवी लढत मतदारांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पाहायला मिळत आहे. अहेरी विधानसभा मतदार संघात बाप लेक आणि पुतण्याची जोरदार लढत बघायला मिळत आहे. राज परिवारात फुटीमुळे संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात पहिल्यांदाच मुली विरुद्ध वडील असा राजकीय संघर्ष पेटला आहे.
अहेरी आणि आलापल्ली विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर वडील आत्राम यांच्या विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून भाग्यश्री आत्राम यांनीं वडिलांच्या विरोधात बंड पुकारत थेट वडिलांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच वडील विरुद्ध मुलगी असा राजकीय संघर्ष उभा झाला आहे. दरम्यान या विषयी बोलताना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका करत आमचे घर फोडण्यास शरद पवारच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
पवार साहेब यांनी राजकीय जीवनातली फार मोठी चूक केली- धर्मरावबाबा आत्राम
अहेरी विधानसभेत कधी नव्हे ती ऐतिहासिक निवडणूक होत आहे. माझी मुलगी माझ्या विरोधात असली तरी काही टक्क्याच फरक पडेल. त्या चार किंवा पाच नंबर वर राहणार आहे. 52 वर्षे मी या क्षेत्रात काम करत आहे. मागील चार वर्षा आधी या विधानसभा क्षेत्राची जवाबदारी माझी मुलगी आणि जावई वर असून ते हा मतदारसंघ पाहत होते. काय म्हणून ते पवार साहेबांकडे गेले मला माहित नाही. मात्र पवार साहेबांनी घर फोडायच काम केलं. त्यांच्या राजकीय जीवनात त्यांनी केलेली ही मोठी चूक आहे.
बारामतीमध्ये घर फुटलं आणि अहेरीमध्ये घर फोडायच काम त्यांनी केलं. माझ्या विरोधात मुलीला उभं केलं, ही त्यांनी राजकीय जीवनात फार मोठी चूक केली. मात्र स्वतः पवार साहेब इकडे आले आणि फिरले तरी काही फरक पडणार नाही. अशी घणाघाती टीका करत मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
पुतण्या राजे अंबरीश आत्राम ही माझ्या विरोधात आहे. त्याच्याशी देखील माझी लढत आहे. राजे अंबरीशराव आत्राम हे भाजप बंडखोर नाही, तर ते नाग विदर्भ आंदोलन समितीचे उमेदवार आहे, ते भाजपचे नाहीत. दरम्यान माझा दीड लाखाहून अधिक लोकांशी थेट संपर्क झाला आहे. लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांमुळे पॉझिटिव्ह वातावरण आहे. रोजच्या सभेच्या धावपळीमुळे माझी तब्येत खराब झाली तरी मी लोकांना भेटत आहे. 23 तारखेला गुलाल आम्हीच उधळणार आणि ऐतिहासिक विजय होणार. मला 90 टक्के लोकांची पसंती आहे, असा विश्वासही मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी यावेळी व्यक्त केला.