आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील मुख्य रेल्वे स्थानक संकुलाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पॅसेंजर शेडला अचानक आग लागल्याने गोंधळ उडाला. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना बुधवार 11 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. आगीत प्रवासी शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
प्राप्त माहितीनुसार, वर्धा रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रवासी शेड बांधण्यात आले आहे. वर्धा-यवतमाळ रस्त्यावरील रेल्वे स्थानकाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ हा प्रकार घडला. येथील तिकीट घर हे प्रवासी शेडला लागून आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास या शेडला अचानक आग लागली. त्यावेळी आवारात अनेक प्रवाशांची ये-जा सुरू होती. आग लागताच सर्वत्र पळापळ सुरू झाली. आग विझवण्यासाठी रेल्वे विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. वर्धा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा तपास वर्धा रेल्वे पोलिस करत आहेत.