आसमा सय्यद, पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील उदापूर येथे कर्जबाजारी पणाला कंटाळून एका 33 वर्षीय युवा शेतकऱ्याने घराजवळच्या चिक्कूच्या झाडाला दोरीच्या मदतीने गळफास घेत आत्महत्या केली. प्रकाश (पप्पू) दत्तात्रेय सस्ते वय 33 वर्ष असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना बुधवार दि.25 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्येबाबत ओतूर पोलिस स्टेशन मध्ये प्रकाशचे वडील दत्तात्रेय महादू सस्ते यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आत्महत्या केलेले प्रकाश सस्ते हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्याच्या कडे 1 एकर शेती होती. ते किरायाने 7 एकर शेती कसत होता. शेतीसह जोडधंदा म्हणून पशुपालन करून दुधाचा व्यवसाय करायचा. शेतीसाठी आणि दुधाच्या व्यवसायासाठी त्याने जमिनीवर पतसंस्थाकडून कर्ज घेतले होते. तसेच इतर जणांकडून हातउसने ही पैसे त्याने घेतले होते.
गेल्या काही महिन्यांपासून दुधाचे दर कोसळल्याने त्याचे आर्थिक गणित बिघडले होते. त्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी त्यांच्या कडे असलेल्या 18 गायींपैकी 10 त्यांनी गाई विकल्या होत्या. मात्र तरीही कर्जाचा बोजा वाढतच चालला होता. त्याच वेळी आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन लहान मुले यांचे भविष्यात कसे होणार? याची चिंता मागील काही दिवसांपासून त्यास सतावत होती. यामुळे तो प्रचंड तणावात व आर्थिक विवंचनेत होता. याच तणावाखाली त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.