अधिसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कामडी यांचा प्रस्ताव अधिसभेत मंजूर.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- गोंडवाना विद्यापीठात गडचिरोली अधिसभा (सिनेट) दिनांक २४ डिसेंबर २०२४ व दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाली. या अधिसभेत बाब क्रं. अधिसभा सदस्यांनी सादर केलेले प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. अधिसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य गुरदास कामडी यांनी ,”पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर – महिला सक्षमीकरण व सुरक्षा” अध्यासन करण्याचा प्रस्ताव अधिसभेत मांडला. या प्रस्तावाला डॉ. संजय गोरे, प्रशांत दोंतुलवार, संजय रामगिरवार, प्रा.धर्मेंद्र मुनघाटे यांनी अनुमोदन दिले.
ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर. सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांना विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क, प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशती जन्मशताब्दी देशभर साजरी केली जात आहे. याच पर्वावर हे अध्यासन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव गुरुदास कामडी यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेत सादर केला.
अहिल्यादेवीने प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला. धर्म, रूढी, परंपरा यापलीकडे कर्तव्य महत्त्वाचे माणून रयतेला कल्याणकारी राज्य दिले. सुखी, समाधानी आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्यादेवीनी धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता, समता व न्याय या तत्त्वाप्रमाणे राज्य केले.
अहिल्यादेवी म्हणजे तळपती समशेर आणि लखलखती वीज होती. त्यांनी आपल्या आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात कार्य केलेले आहे.
सर्वधर्मसमभावाचा आदर्श मिरवीत मंदिरे, गरुद्वार व विहारे बांधली. तर काही मंदीरांचा जीर्णोद्धार केला. स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जातीभेदाला तडा दिला. अहिल्याबाई ह्या समाजसुधारक होत्या. अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक, लोकमाता व राष्ट्रमाता होत्या. असे अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी प्रस्तावाची भुमिका मांडताना सभागृहाला सांगितले.
अहिल्यादेवी यांच्या त्रिशती जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या कार्याला व विचाराला विनम्र अभिवादन करण्याच कार्य तसेच महिला सशक्तीकरणासाठी विविध उपक्रम, प्रशिक्षण, महिला सुरक्षा व स्वाभिमान चालना देण्याचे कार्य या अध्यासनाच्या माध्यमातून गोंडवाना विद्यापीठाला मिळणार आहे. असे ही गुरुदास कामडी यांनी सांगितले.