मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नोबल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था भवरलाल कांताबाई जैन ट्रस्ट जळगाव च्या वतीने दरवर्षी नोबल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन इयत्ता पाचवी ते बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी केले जाते. या परीक्षेतील गुणवत्ता यादीत आलेल्या तब्बल १२५ विद्यार्थ्यांची इस्त्रोची सफर घडणार असून त्यात हिंगणघाट येथील यथार्थ कौस्तुभ जनईकर ची निवड करण्यात आली आहे.
तो हिंगणघाट येथील जी बी एम एम मोहता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य लतिका बेलेकर यांचा नातू आहे. गणित विज्ञान तंत्रज्ञान या विषयावर आधारित परीक्षेतून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. सदर विद्यार्थी इस्त्रो, आयआयटी, सायन्स सिटी, आयआयएम या शिक्षण व तंत्रज्ञान संस्थांना भेट देणार आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याची ही उत्कृष्ट संकल्पना आहे. महाराष्ट्रातून एकाच वेळी १२५ विद्यार्थ्यांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे उल्लेखनीय. यथार्थच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन वर्षाव होत आहे.

