मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शेती कसणाऱ्या जन्मदात्या पित्याने आत्महत्या केल्याने व पुढे त्या मुलांच्या मातेनेही परिस्थितीपुढे हतबल होऊन आत्महत्या केल्यामुळे बालपणीच माता-पित्याचे छत्र हरविलेल्या त्या दोन निरागस भगिनींना उद्याचा दिवस कसा उजाडेल याची कल्पना नव्हती.
यापूर्वी देशोन्नतीने हिंगणघाट शहरातील दोन निराधार बालकांची आपबिती प्रकाशित केली होती. सदर बातमी वाचल्यानंतर कोल्ही शाळेतील शिक्षकांनी आमदार समीर कुणावार यांच्यासोबत संपर्क साधला व नंतर या दोन्ही मुलांना दत्तक घेत असल्याचे आमदार समीर कुणावार यांनी जाहीर केले आणि या प्रेम घोडमारे आणि तनुजा घोडमारे या दोन्ही मुलांच्या आयुष्याला नवा आयाम मिळाला.
ही दोन्ही मुले कोल्हीच्या प्राथमिक शाळेत शिकत होती. या दुर्दैवी परिस्थितीचा सामना करण्याचा कसलाच आधार त्यांना नव्हता. देशोन्नतीतील वार्तांकनानंतर आमदार समीर कुणावार यांनी कोल्ही शाळेतील शिक्षिका दिपाली सावंत व शिक्षक परमेश्वर नरवटे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी त्यांच्या शाळेत शिकताना तसेच घरी जगताना या दोन्ही बंधूभगिनीच्या खडतर आयुष्याच्या प्रवासाची सविस्तर माहिती आमदार समीर कुणावार यांचे कानी घातली. प्रेम घोडमारे व तनुजा घोडमारे या मुलांचे वडील अरविंद घोडमारे शेतकरी होते. अरविंद घोडमारे यांनी शेतीच्या नापिकीमुळे, कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या केली.
■ आमदार कुणावार यांनी दोन्ही मुलांना घेतले दत्तक आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील दोन निराधार मुलांचे आयुष्य बदलले: काही दिवसातच परिस्थितीला कंटाळून मुलांची आई लिला घोडमारे यांनीसुद्धा आत्महत्या केली आणि निरागस दोन्ही बालके आई-वडिलांविना पोरकी झाली. कुटुंबात मुलांना सांभाळणारे कोणीच नाही. मुलं आजोळी आजोबाकडे राहायला आली, अगोदरच अठराविश्वे दारिद्र्य त्यात तरुण मुलगी, जावई डोळ्यादेखत गेलेले पाहून चंद्रभान कौरासे पुरते खचलेले, पण मुलांना जगण्यासाठी एक आधार मिळाला. सगळं व्यवस्थित चालले असतानाच या मुलांच्या आयुष्यातील संकट सातत्याचा पाठलाग संपत नव्हता. पुढे दोन घास खाऊ घालणारी आजीही हे जग सोडून गेली. कोणाकडे पहायचे, कसं जगायचे हा मोठा प्रश्न या मुलांसमोर आ वासून उभा होता. म्हातारे आजोबा या मुलांच्या आयुष्याचा आधार बनले पण सततच्या आजारपणामुळे आणि दोन वेळच्या जेवणाचीही व्यवस्था नसल्याने ही मुले कसं बसं आयुष्य जगत होती. या सर्व गोष्टी शिक्षिका दिपाली सावंत यांच्या मनाला वेदना देणाऱ्या होत्या. जेवढे जमेल तेवढे आपण या मुलांकरीता करायचे असा निश्चय दिपालीताईंनी केला होता. त्यातच या दोन्ही मुलांची व्यथा देशोन्नतीने मांडली आणि या दोन्ही अनाथ मुलांची दखल घेणारा अनाथांचा नाथ समोर आला.
शिक्षकांनी आमदार कुणावार यांना या मुलांची संकटमालिका सांगितली. आमदार समीर कुणावार यांनी लगेच या मुलांना मी दत्तक घेतो आणि आयुष्यभरासाठी जे जे लागेल त्याचा पुरवठा मी करतो अशी ग्वाही दिली व लगेच त्यांना लागणाऱ्या सर्व बाबी आमदार समीर कुणावार यांनी घेऊन दिल्या. आता या मुलांच्या आयुष्यात नवा प्रकाश आला आहे. जगण्याची त्यांची आशा पल्लवीत झाली आहे. एक बातमी या मुलांचे आयुष्य बदलवायला कारण ठरली. त्यातच नुकताच दहावीचा निकाल लागला आणि प्रचंड संघर्ष आणि अपार मेहनत करून, ज्ञानदाच्या छत्रछायेत, प्रेम 79 टक्के गुण घेऊन शैक्षणिक वाटचालीचा पहिला टप्पा त्याने पार केला. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या जीवनात जगण्याची नवी आशा पल्लवीत झाली होती ती आता खरी ठरताना दिसत आहे.
तनुजा हिंगणघाटमध्ये B. Pharm करीत आहे आणि प्रेम पुढील शिक्षणासाठी आता लातूरला जाणार आहे. शाळेतील शिक्षक व आमदार कुणावार यांच्या सहकार्याने या दोन्ही अनाथ मुलांचे भविष्य उज्वल होताना दिसत आहे. दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल व प्रेमला प्रोत्साहन देण्यासाठी आमदार कुणावार यांनी त्याचा सत्कार केला. प्रसंगी उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, नायब तहसीलदार कांबळे साहेब, शिक्षिका दिपाली सावंत उपस्थित होत्या. एका बातमीने मुलांचे आयुष्य बदलविले त्याबद्दल आमदार समीर कुणावार व शिक्षक परमेश्वर नरवटे आणि दिपाली सावंत यांचे परिसरात सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

