प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक २५ मे २०२५ रोजी हिंगणघाट येथे एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण साजरा करण्यात आला. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, हिंगणघाट यांच्या वतीने जिल्हा वार्षिक योजना (नाविन्यपूर्ण योजना) सन २०२४-२५ अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्याकरणाचा भूमिपूजन समारंभ अत्यंत उत्साहात आमदार मा.समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते पार पडला.
या भूमिपूजन समारंभाचे आयोजन केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर तो सामाजिक एकतेचा, परिवर्तनाचा आणि श्रद्धेचा एक सशक्त संदेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांना, मूल्यांना आणि त्यांच्या सामाजिक योगदानाला अभिवादन करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी आयोजिलेला “भीमगीतांचा अनोखा सुफी नजराणा” हा विशेष कार्यक्रम हा उपस्थितांसाठी एक अनोखा आध्यात्मिक आणि भावनिक अनुभव ठरला. भीमगीतांमधून बाबासाहेबांचे विचार, समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांची सुफी संगीतातून अभिव्यक्ती झाली. संगीताच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि परिवर्तनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा एक अभिनव उपक्रम ठरला.
या भूमिपूजन समारंभात अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, स्थानिक नागरिक, कलाकार आणि कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले.

